एझिवाल (मिझोराम) : उत्तर प्रदेश आणि आसाममध्ये लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा आणण्याच्या हालचाली सुरू असताना ईशान्येकडील राज्य असलेल्या मिझोराममध्ये मात्र जनसंख्या वाढवण्यासाठी मोठे प्रोत्साहन दिले जात आहे. मिझोरामचे क्रीडा मंत्री रॉबर्ट रॉयटे यांनी अधिक मुले जन्माला घालणाऱ्या मिझोरामी दाम्पत्याला स्वतःकडून १ लाख रुपये पारितोषिक देण्याची घोषणा अलीकडेच केली होती.
त्यांच्या घोषणेनुसार त्यांनी मिझोराममधील सर्वाधिक मुलांना जन्म दिलेल्या १७ महिलांना २.५ लाख रुपये वितरित केले आहेत. यावेळी रॉयटे म्हणाले की, महिलांनी अधिक मुलांना जन्म द्यावा यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यास विविध चर्च आणि मिझो असोसिएशन (वायएमए) च्या केंद्रीय समितीने सुरुवात केली आहे.
एक जाहीर कार्यक्रम घेत रॉयटे यांनी रोख पारितोषिक वितरित केले आहेत. यावेळी १५ मुले (८ मुली आणि ७ मुलं) जन्माला घातलेल्या नगुराउवी यांना पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक म्हणून १ लाख रुपये रोख देऊन प्रशस्तीपत्र देण्यात आले. तर १३ मुलांना जन्म देणाऱ्या लियान्थांगी यांना प्रशस्तिपत्र आणि ३० हजार रुपये रोख देण्यात आले आहे. दोन महिला आणि एक पुरुष, ज्यांना प्रत्येकी १२ मुले आहेत, त्यांना तिसरे पारितोषिक म्हणून प्रत्येकी २० हजार रुपये रोख प्रोत्साहन म्हणून देण्यात आले. तर ८ मुले असलेल्या १२ महिलांना प्रत्येकी पाच हजार रुपये रोख देण्यात आले आहे.
येथील प्रेझबिटेरियन चर्च आणि बॅप्टिस्ट चर्चसह, चर्च संप्रदाय मिझोसच्या अस्तित्वासाठी अधिक मुले जन्म देण्याच्या महत्त्वविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी मोहीम राबवत आहेत. तसेच वायएमएने मिझोच्या अस्तित्वासाठी लोकसंख्या वाढवणे ही काळाची गरज आहे, असे सांगून राज्यभरातील तरुण जोडप्यांना अधिक मुले जन्माला घालण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले आहे. दरम्यान, मिझोरामची लोकसंख्या ५२ व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर प्रमाणे राष्ट्रीय सरासरी ३८२ पेक्षा खूप कमी आहे. वांझपणाचा दर आणि मिझो लोकसंख्येचा घटता दर हा अनेक वर्षांपासून येथील गंभीर चिंतेचा विषय बनला आहे.






