विरारमध्ये पाकीटमाराने केला तरुणाचा खून

मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) : येथील स्टेशनजवळील श्रेया हॉटेलच्या गल्लीत चोरटा व तरुणात झालेल्या झटापटीत चोरट्याने पोटात चाकू खुपसल्याने, तरुण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारार्थ रुग्णालयात पाठविण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने, विरार पोलीस जबरी चोरी व खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, विलेपार्ले येथे राहणारा हर्षल वैद्य (३०), त्याची पत्नी प्रियंका आणि सासू प्रभावती मानकामे (६०) हे तिघे बुधवारी विरार येथे राहणाऱ्या नातेवाइकांकडे नवरात्रीनिमित्ताने आले होते. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मुंबई येथील घरी जाण्यासाठी विरार रेल्वे स्थानकाजवळील पश्चिमेकडील तिकीट खिडकीवर तिकीट काढण्यासाठी आले. त्याचवेळी एका चोरट्याने हर्षलचे पाकीट चोरून रेल्वे स्थानकाच्या बाहेर पळू लागला. हर्षल व इतर लोकांनी चोरट्याचा पाठलाग केला. स्टेशनजवळील श्रेया हॉटेलच्या शेजारील अरुंद बोळात अंधारात लपून बसलेल्या पाकीटचोराला बाहेर येण्यास सांगितले. पण, तो बाहेर न आल्याने हर्षल त्याला पकडण्यासाठी बोळात घुसला. यावेळी चोर आणि हर्षल यांच्यात झटापट झाली. याच झटापटीत चोरट्याने त्याच्याजवळील धारदार चाकू हर्षलच्या पोटात खुपसून गंभीर दुखापत केली.

यात हर्षल गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, त्याची स्थिती नाजूक असल्याने मुंबईच्या शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. पण त्याचा तिथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here