मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) : दारुच्या नशेत आईसोबत भांडण करणाऱ्या वडिलांच्या डोक्यात हातोडा मारून मुलानेच त्यांचा खून केल्याची घटना दहिसरमध्ये घडली. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी संदीप उर्फ बाळा अण्णाराव बनसोडे (२५) याच्या विरोधात खूनाचा गुन्हा नोंदवला आहे. दहिसर परिसरात राहणाऱ्या अमोल अण्णाराव बनसोडे याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत पुढील तपास सुरू केला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, ६० वर्षीय अण्णाराव बनसोडे बांधकाम मजूर होते, तर भाऊ बदलीवर चालक म्हणून काम करतो. वडील दारुच्या नशेत घरात येऊन आईला मारहाण करायचे. सोमवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे कामावर गेला. संध्याकाळी सातच्या सुमारास वडील बेशुद्ध पडल्याचे मित्राकड़ून समजताच तो घरी गेला. घरी पोहोचत असताना भाऊ संदीप रस्त्यात भेटला. त्याच्याकडे विचारणा करताच, समोर आलेल्या माहितीत त्याला धक्का बसला.
संदीपने सांगितले की, पप्पा दारू पिऊन घरात आईशी भांडण करत होते. मी घरी आलो. त्यावेळी पप्पांनी घरातील स्वयंपाक गॅसचे बटन चालू केल्याने सुरुच होता. तसेच पप्पा हातोड्याने घरातील लादी तोडत होते. आईलाही शिविगाळ करत होते. मी त्यांना अडविण्यासाठी गेलो असता पप्पांनी मलाही शिविगाळ करून मारहाण केली. याच रागात घरातील टोच्या उचलून त्यांच्या पाठीत खुपसला. त्यानंतरही पप्पा माझ्या अंगावर धावून आल्याने मी लादीवर पडलेला हातोडा उचलून पप्पांच्या डोक्यात मारला. त्यामुळे पप्पा घरात लादीवर बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे सांगितले. त्याने तत्काळ घरी धाव घेत जवळच्या डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अमोलने पोलिसांशी संपर्क साधून त्यांना घडलेला घटनाक्रम सांगितला. त्यानुसार मंगळवारी पहाटेच्या सुमारास भावाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






