पुणे (विशेष प्रतिनिधी सुभाष शांताराम जैन) : मुलांना वाचनाची गोडी लागावी या दृष्टीने सातत्याने प्रयत्नशील असलेल्या लेखिका व संकल्प इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ. ज्योती शंकर(राज) परब यांनी लिहिलेल्या सीतामाता आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनाची संघर्षगाथा ( चित्रमय कथा ) या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते संपन्न झाले. वाचन प्रेरणा दिन(भारतरत्न ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंती) आणि दसरा याचे औचित्य साधून पुणे येथे बाबासाहेबांच्या निवासस्थानी सदर छोटेखानी प्रकाशन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या आशिर्वादपर शुभेच्छा देताना सांगितले की ” डॉ. ज्योती परब यांनी लिहिलेले पुस्तक हे अबालवृद्धांना आवडेल. विशेषत: यामध्ये असलेल्या आकर्षक रंगीत चित्रांमुळे मुलांना कथा आकलन करणे सोपे जाईल. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनीच या पुस्तकाचा आनंद घ्यावा व हे पुस्तक सर्वानी भेटस्वरूप द्यावे ” असे आवाहन केले.
या प्रसंगी साहित्य गौरव संस्था-पुणे यांचे वतीने डॉ. ज्योती परब यांना ‘साहित्य संवर्धन पुरस्कार २०२१’ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक संकल्प इंग्लिश स्कूलचे संस्थापक आणि लेखक डॉ. शंकर ( राज) परब आणि सूत्रसंचालन संपादक व लेखक डॉ. योगेश जोशी यांनी केले.
चित्रमय रामायण पुस्तकातील प्रसंग चित्रमय स्वरुपात रेखाटन करणारे जळगाव येथील राज्य पुरस्कार प्राप्त कला शिक्षक व चित्रकार श्री. लिलाधर कोल्हे यांना अखिल भारतीय कला, क्रीडा व सांस्कृतिक अकादमीच्या वतीने बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते ‘कलागौरव पुरस्कार-२०२१‘ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. चित्रमय रामायण पुस्तकाचे प्रकाशन लता गुठे यांच्या भरारी प्रकाशनाच्या वतीने करण्यात आले आहे.
सदर पुस्तक प्रकाशन समारंभासाठी साहित्य गौरव संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मधुसूदन घाणेकर , भावकवी व महाकवी कालिदास संस्थेचे संस्थापक वि. ग. सातपुते तथा आप्पा , ज्येष्ठ कवियत्री मंदाताई नाईक , साहित्यिका उर्मिलाताई कराड ,समाजसेवक दिवाकर घोटीकर, अक्षर आनंद न्यूज पोर्टलचे संपादक हेमंत नेहेते, हिंदीचे गाढे अभ्यासक व साहित्यिक प्रा. महेंद्रदास ठाकूर, आदी मान्यवर उपस्थित होते.







