मोबाईल देत नसल्याचा राग आल्याने पत्नीने विळ्याने पतीचे ओठ कापले

भंडारा (प्रतिनिधी) : आजच्या मोबाईलच्या जमान्यात मोबाईल मिळावा म्हणून कोणी किती टोक गाठू शकते याचा प्रत्यय देणारी घटना भंडाऱ्यातील मासळ येथे घडली आहे. येथे एका पत्नीने मोबाईलसाठी आपल्या पतीचे विळ्याने ओठ कापले आहेत. याप्रकरणी पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, भंडाऱ्यातील मासळ येथे खेमराज बाबुराव मुल (वय – ४०) यांचा मोबाईल बिघडला असल्याने त्यांनी त्यांच्या पत्नीचा मोबाईल घेतला. मात्र, दोन दिवस उलटूनही त्यांनी पत्नीला तिचा मोबाईल परत केला नाही . याचा पत्नीला राग आल्यामुळे गुरुवारी (दि.१४ ऑक्टोबर) त्यांच्यात मोबाईलवरून मोठे भांडण झालं. भांडण इतक्या विकोपाला गेलं की पत्नीने रागाच्या भरात घरातील विळा खेमराज यांना फेकून मारला. हा विळा खेमराज यांच्या तोंडावर बसला आणि त्यात त्यांचे ओठ कापले गेले.

जखमी अवस्थेत खेमराज हे लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर खेमराज यांच्या जबाबावरुन आणि वैद्यकीय तपासणीनंतर त्यांच्या पत्नीविरोधात लाखांदूर पोलीस ठाण्यात कलम ३२४ आणि ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here