– योगेश शुक्ल (९६५७७०१७९२)
मराठी चित्रसॄष्टीला सुवर्णकाळ दाखवणारे मराठी शोमॅन दादा कोंडके व त्यांचे अस्सल मराठी मातीशी इमान राखणारे गावरान भाषेतील इरसाल विनोदी चित्रपट हा एक अमूल्य ठेवा आहे. त्यांच्या चित्रपटांइतकीच किंबहुना त्याहूनही सरस असणारी त्यातील गीते आज ५० वर्षानंतर देखील तितकीच श्रवणीय आहेत .मुंबईतील नायगाव येथे ८ ऑगस्ट १९३२ रोजी जन्म झालेल्या या महान विनोदवीराच्या जीवनावर टाकलेला हा कटाक्ष. या दिग्गज अभिनेत्याने आणि चित्रपटकर्त्याने मराठी चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एक सरस चित्रपट दिले. ‘विच्छा माझी पुरी करा’ या वगनाटय़ापासून सुरू झालेला ‘त्यांचा’ प्रवास चित्रपटसृष्टीकडे वळला आणि सलग नऊ रौप्यमहोत्सवी चित्रपट देऊन अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि इतरही भूमिकांमध्ये वावरलेल्या दादा कोंडके यांनी आगळा विक्रम घडविला. मराठी चित्रपटांतल्या विनोदी ढंगातील संवादफेकीमुळे त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या. अभिनयासोबतच त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेतील व सोबतच हिंदी व गुजराती भाषांतील चित्रपटांची निर्मितीही केली. प्रेक्षकांना नेमके काय हवे आहे याची चांगलीच जाण त्यांना होती. कमरेखालचे विनोद असे हिणावणारे सुद्धा त्यांचे चित्रपट मिटक्या मारत बघत
दादांचा जन्म लालबागचा, गिरणी-कामगाराच्या पोटी. ८ ऑगस्ट, १९३२ रोजी, गोकुळाष्टमीच्या शुभप्रसंगी लाभलेल्या या पुत्र’रत्ना’चे कृष्णा म्हणून नामकरण करण्यात आले. पोरक्या वयातच या कृष्णाच्या लीला उसळून बाहेर येऊ लागल्या. शाळकरी वयातच त्यांना गल्लीतले ‘दादा’ म्हणून ओळखले जात असे. ही ‘बिरुदावली’ नंतर कायम राहिली. जेष्ठ बंधूंच्या अपकाली निधनामुळे घर सांभाळायची जबाबदारी आली. ‘अपना बाजार’ मध्ये दरमहा साठ रुपयाने कामावर असतानाच दादा सेवादलाच्या बँडमध्ये काम करू लागले. कलेचा नाद शांत बसू देईना, म्हणून प्रसिद्ध गाण्यांची विडंबने करणे, विचित्र गाणी रचणे, त्यांना चाली लावणे हे फावल्या वेळेतले छंद त्यांनी जोपासले. सेवादलात असतानाच त्यांची गाठ निळू फुले, राम नगरकर यांच्याशी पडली. आणि सेवादलाच्या नाटकांत दादा छोटी-मोठी कामे करू लागले. लहानपणापासून खोड्याळ (काहीसे मवाली) असलेल्या दादांनी ‘अपना बाजार’ येथे नोकरी केली. सोडावॉटर बाटल्या, दगड- विटांनी मारामारी केल्याचे दादांनी एका मुलाखतीत सांगितले आहे. एका वर्षातच त्यांच्या कुटुंबातल्या प्रमुख व्यक्तींशी ते काळाने दुरावले व तेव्हा पासून एकटे पडलेल्या दादा कोंडकेंनी जीवन हे खेळकरपणे घालवण्याचा निश्चय केला. नायगाव परिसरात – “बॅंडवाले दादा” ह्या नावाने त्यांना लोकं ओळखू लागले. तेथेच त्यांना जीवाभावाचे मित्र मिळाले. सुपरस्टार झाल्यावरही दादा तेथे जात व जुन्या मित्र मंडळीत रमत.
पथ-नाट्यात आपल्या विनोदाच्या टाईमिंगवर हशा उसळवणा-या दादांचे प्रसिद्ध होणे त्यांच्या सेवादलातील साथीदारांना पाहवले नाही. ‘खणखणपुरचा राजा’ मधील गाजणारी भूमिका सोडून, सेवा दलातून फारकत घेत दादांनी स्वतःचा फड उभारला. शाहीर दादा कोंडके वसंत सबनिसांच्या ‘विच्छा माझी पुरी करा’ नाटकातून पुन्हा रंगभूमीवर उतरले. दादांच्या आयुष्यातील हे वळण दादांच्या आणि एकूणच महाराष्ट्राच्या भविष्यावर फार मोठे उपकार करून गेले. दादांनी परत मागे वळून कधी पाहिलेच नाही. ‘विच्छा’चे १५०० हून अधिक प्रयोग झाले. आणि दादांसारखे रत्न भालजी पेंढारककरांसारख्या पारख्याच्या नजरेत पडले. १९६९ साली भालजी पेंढारकरांच्या ’तांबडी माती’ ह्या चित्रपटातून पदार्पण केलेल्या दादांनी मग मागे वळून बघितले नाही. जून १९७१, ‘सोंगाड्या’ प्रदर्शित झाला. वादग्रस्त दादांच्या यशस्वी कारकिर्दीची सुरुवातही वादग्रस्तच असायला हवी असाच विधीसंकेत असावा….. कोहिनूर सिनेमाच्या मालकांनी दादांच्या (सोंगाड्याच्या) आगाऊ आरक्षणाला बगल देऊन देवानंदचा ‘तीन देवियाँ’ हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे ठरवले. दादांनी बाळासाहेब ठाकरेंना साकडे घातले…… मग काय विचारता; शिवसैनिकांनी कोहिनूर बाहेर “राडा” घातला! कोहिनूरच्या मालकांना सेनेचा दणका मिळताच ‘सोंगाड्या’ प्रदर्शित करावयाचे सोंग आणावे लागले…… पण सोंगाड्या सुपर डुपर हिट्ट ठरला व मरगळलेल्या मराठी चित्रपटसृष्टीत खळबळ माजली. सोंगाड्या तुफान गाजला. इतका की ब-याच सिनेमागृहांनी जेमतेम चालत असलेला देव आनंदचा ‘तेरे मेरे सपने’ उतरवला आणि सोंगाड्या लावला. महाराष्ट्राने सोंगाड्या डोक्यावर उचलून घेतला. खुद्द दादा कोंडके मिळालेल्या अभूतपूर्व यशाने भारावून गेले होते. मिळालेल्या लोकप्रियतेचा पुरेपूर वापर करून घेत दादांनी लगेच पुढल्या चित्रपटाची घोषणा केली.
१९७२ साली ‘एकटा जीव सदाशिव’ प्रदर्शित झाला. या चित्रपटाची हाईप इतकी झाली होती, की खुद्द राज कपूरने आपल्या पोराला लाँच करताना चित्रपटाची तारीख पुढे ढकलली आणि ‘बॉबी’ पाच महिने उशिरा प्रदर्शित झाला. असे म्हणतात की बॉबी प्रदर्शित करताना राज कपूरला सिनेमागृहांना ‘एकटा जीव सदाशिव’ उतरवण्याची विनंती करायला लागली होती. बॉबी गाजलाच, पण त्यामागोमाग आलेल्या ‘आंधळा मारतो डोळा’ने लाईम-लाईट पुन्हा दादा कोंडकेंवर आणला.
१९७५ मध्ये पांडू हवालदारच्या रुपात दादा पुन्हा पडद्यावर आले. पांडू हवालदार मध्ये दादांनी ‘अशोक सराफ’ या उमद्या कलावंताला संधी दिली. यातूनच दादांची दूरदृष्टी दिसून येते. मुंबई पोलिसांचा हा हवालदार तिकीट्बारीवर MI6 च्या एजंटला भारी पडला. पांडू हवालदारमुळे मुंबईत MGM ला The Man With The Golden Gun लावायला सिनेमागृहे मिळेनात. कधी नव्हे ते जेम्स बाँडचा सिनेमा महाराष्ट्रात फ्लॉप गेला. त्याचबरोबर दादांचा आलेख मात्र चढत गेला.
स्वत:च्या “कामाक्षी प्रॉडक्शन” ह्या चित्रपट निर्मिती कंपनीतर्फे १६ चित्रपट प्रकाशित करणाऱ्या दादांनी ४ हिंदी व १ गुजराती चित्रपट प्रकाशित केला. १९७२ – एकटा जीव सदाशिव, १९७३ – आंधळा मारतो डोळा, १९७५- पांडू हवालदार, १९७६ – तुमचं आमचं जमलं, १९७७ – राम राम गंगाराम, १९७८- बोटं लावीन तेथे गुदगुल्या, १९८०- ह्योच नवरा पाहिजे, १९८७ – आली अंगावर, १९८८- मुका घ्या मुका, १९९०-पळवा पळवी, १९९२- येऊ का घरात व १९९४- सासरचे धोतर हे चित्रपट त्यांच्या कामाक्षी प्रॉडक्शन ने प्रकाशित केले. १९८१ साली ‘गनिमी कावा’ त्यांनी दुसर्या बॅनर खाली केला.
एखाद्यावर पूर्ण विश्वास कसा टाकावा हे दादांकडून शिकावे….. कामाक्षी प्रॉडक्शनची टीम वर्षानुवर्षे कायम राहिली….. त्यात उषा चव्हाण ही अभिनेत्री, राम लक्ष्मण ह्यांचे संगीत, महेंद्र कपूर व उषा मंगेशकर – पार्श्वगायनासाठी तर ‘बाळ मोहिते’ प्रमुख दिग्दर्शन सहाय्यक. लागोपाठ ९ मराठी चित्रपटांच्या रौप्यमहोत्सवी आठवड्यांचे ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ त्यांनी केले.
हिंदीतून – तेरे मेरे बीच में (१९८४); अंधेरी रात में दिया तेरे हात में (१९८५), खोल दे मेरी जुबान (१९८६), आगे की सोच (१९८९) हे चित्रपट त्यांनी प्रकाशित केले. १९७७ साली पांडू हवालदार ह्या मराठी चित्रपटाच्या धर्तीवर “चंदू जमादार” हा गुजराती चित्रपट प्रका्शित केला……
सोंगाड्या चित्रपटात त्यांनी नाम्याची भूमिका केली व तीच त्यांच्या जीवनाचा ‘टर्निंग पाँईंट’ ठरला. नाम्या कलावतीच्या तमाशाला जातो व त्याला तमाशाची चटक लागते हे त्याच्या ‘आये’ ला आवडत नाही. ती त्याला घराबाहेर काढते व तो कलावतीच्या आश्रयाला जातो व तेथे तो तमाशात नावांरूपाला येतो असे हे कथानक आहे. ह्या भोळ्या ‘नाम्या’ ने दादांना एका रात्रीत यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले. पण उभ्या आयुष्यात त्याच ‘नाम्या’ सारखे दादा साधेपणाने वावरले. ताडदेवच्या कामाक्षीच्या कार्यालयात त्यांना भेटायला त्यांचे चाहते महाराष्ट्रातल्या कानाकोपर्यांतून यायचे व दादांनी त्यांना कधीच निराश परत जाऊ दिले नाही. चाहत्यांबरोबर फोटो सेशन हा त्यांचा वेगळा दैनिक कार्यक्रम असे…. चाहत्यांकडून स्वत:च्या चित्रपटातले संवाद, क्षण वगैरे ते त्यांच्यात समरसून ऐकून घेत…… कुणी त्यांना आपल्या मुला-बाळांच्या विवाहाचे निमंत्रण देण्यास येई तर कुणी दुकानांच्या उद्घाटनाचे…. पण ‘तांबडी माती’ हा पहिला चित्रपट केलेल्या ह्या साध्या भोळ्या नटसम्राटाने स्वत:चे पाय त्याच मातीवर घट्ट रोवून ठेवले होते! त्यांच्या सारखा खरोखरचा ‘डाउन टू अर्थ’ नट मिळणे असंभव !
दादांची अवघी कारकीर्द वादग्रस्त होती….. सेन्सॉर च्या दंडेलीपुढे नमते न घेण्याची प्रवृत्ती किंवा नियमाविरुद्ध जाण्याची खुमखुमी; त्यांची शिवसेनेशी बांधीलकी; त्यांचे प्रणय; त्यांचे व्यक्तिगत आयुष्य ते मृत्यूनंतर उठलेले वाद हे एका वादग्रस्त चरित्राचे पैलू असावेत. कायद्याने ते विवाहित होते व तेजस्विनी नावाची त्यांना कन्या होती. पण जनमानसांत ते अविवाहित म्हणून वावरले.
मार्च १४, १९९८ रोजी पहाटे ३. ३० ला रमा निवास ह्या दादरच्या निवासस्थानी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना बाजूच्याच सुश्रूषा नर्सिंग होम मध्ये हालवण्यात आले. आदल्याच दिवशी त्यांचे स्नेही डॉ. अनिल वाकणकरांनी त्यांना तपासले होते पण शेवटी त्यांचे सुश्रूषा हॉस्पिटलात प्राणोत्क्रमण झाले. त्यावेळी त्यांची मोठी बहीण लीलाबाई मोरे हयात होत्या. पुतण्या विजय कोंडकेंनी त्यांच्यावर अंतिम संस्कार केले…….
मृत्यूनंतरही वादांनी दादांचा पिच्छा पुरवला. वाद होता दादांच्या वारसा हक्कांबाबत. दादांनी मृत्युपत्रात आपली संपत्तीची कार्यवाह म्हणून एक संस्था स्थापन केली होती / करायला सांगितले होते. विश्वस्त म्हणून उषा चव्हाण, डॉ. अनिल वाकणकर, साबीर शेख ( त्या काळचे कामगार मंत्री), गजानन शिर्के व वसंत भालेकरांचा समावेश होता. पुढे दादांच्या वारसांनी त्यांच्या मृत्युपत्राला न्यायालयात आव्हान दिले व त्यांची सर्व संपत्ती वादग्रस्त ठरली.







