नाशिक (विशेष प्रतिनिधी) : पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असल्याचे भासवून राहुरीच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे वारंवार पैशाची मागणी करणाऱ्या देवळाली प्रवरा येथील खंडणीखोराला पोलीस पथकाने गजाआड केले आहे.
इब्राहिम फत्तूभाई शेख असे अटक केलेल्याचे नाव असून, तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे यांनी याप्रकरणी राहुरी पोलिसांत फिर्याद दिली होती. देवळाली प्रवरा येथील इब्राहिम शेख हा पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असल्याचे भासवून गेल्या तीन वर्षांपासून वारंवार पैशाची मागणी करत ठोकळे व मंडल कृषी अधिकारी राहुल ढगे यांच्याकडून खंडणी वसूल करत होता. महिन्याला दोन हजार रुपये द्या नाहीतर माहिती अधिकार तसेच तुमच्या कृषी विभागातील कारभाराची बातमी छापण्याची शेख याच्याकडून धमकी दिली जात होती.
इब्राहिम शेख याच्या वारंवार पैसे मागणीला कंटाळून महेंद्र ठोकळे यांनी राहुरी पोलिसांत धाव घेतली. गुरुवारी (दि. 14) शेख याने ठोकळे यांच्याकडे तीन हजार रुपयांची मागणी केल्याने तडजोडीअंती दोन हजार रुपये देण्याचे ठरले. शेख याने दुपारी तालुका कृषी कार्यालयात जाऊन ठोकळे यांच्याकडून खंडणीचे दोन हजार रुपये स्वीकारताच पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेतले.
तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे यांच्या फिर्यादीवरून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मधुकर शिंदे तपास करीत आहेत. पोलीस नाईक विकास साळवे, रोहित पालवे, शशिकांत वाघमारे, रवींद्र कांबळे यांनी ही कारवाई केली.






