यवतमाळ (प्रतिनिधी आसिफ कुरैशी) : शहरात स्त्रीशक्तीच्या पूजनाचा जागर सुरु असतांनाच महिलांवरील अत्याचारात मात्र भर पडत आहे. येथे एका युवकाने बहिणीच्या मैत्रिणीवर अत्याचार केला. त्याने तिला बेशुद्ध करून अनोळखी ठिकाणी नेऊन जिवघेणी मारहाण केल्यानंतर घरी आणून सोडून दिले. शुक्रवारी सकाळी पीडितेचे वडील घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
अक्षय शरद बगमारे उर्फ बागा (२५) रा.जामनकरनगर असे या युवकाचे नाव असून, त्याने अल्पवयीन असतानाच गंभीर गुन्हे केले आहे. अक्षय राठोड टोळीच्या तो सतत संपर्कात असायचा. त्याच्या बहिणीची मैत्रिण असलेल्या मुलीलाच त्याने आपल्या वासनेची शिकार बनविले. घरात आईचा कॅन्सरने मृत्यू झालेला. त्याच धसक्यात मोठी बहीणही दगावली. वडील व ती असे दोघेच घरी राहात होते. याचाच फायदा घेऊन आरोपी अक्षयने तिला वडिलांना ठार करण्याची धमकी देऊन तिच्यावर दोन-तीनवेळा बळजबरी केली.
गुरुवारी रात्री २ वाजता अक्षय तिच्या घरी पोहोचला. तेव्हा तो दारूच्या नशेतच होता. त्याने पुन्हा तिच्यावर बळजबरी केली. नंतर तिला बेशुद्ध केले. तेथून तिला अनोळखी ठिकाणी घेऊन गेला. त्याठिकाणी दोन साथीदारांनी पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. तिला बेदम मारहाण करण्यात आली. शुद्धीवर आल्यानंतर ऑटोत बसून घरी सोडून दिले. ड्युटीवरून परत आलेल्या वडिलांना शुक्रवारी सकाळी हे दृश्य दिसले. भीतीपोटी ती काहीच बोलायला तयार नव्हती. तिच्या तोंडातून रक्त सांडत होते. संपूर्ण शरीरावर, गुप्तांगावर मारहाणीच्या गंभीर जखमा होत्या. अशाही स्थितीत भीतीमुळे तिच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. अखेर तिच्या वडिलाने पोलीस नातेवाइकाच्या मदतीने धीर देत विचारपूस केली. तेव्हा अक्षय बगमारे याने हे कृत्य केल्याचे सांगितले.
आता तिची प्रकृती गंभीर असून शासकीय रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहे. अवधूतवाडी पोलिसांनी पीडितेच्या जबाबावरून अक्षय शरद बगमारे उर्फ बागा याच्यावर ३७६ (२)(एन), ३२३, ५०४, ५०६ व अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पसार झाले असून अवधूतवाडी पोलीस त्यांचा शोध घेत आहे.






