असंघटित कर्मचारी संघटनेची ना. थोरात यांच्याकडे मागणी
शिर्डी (प्रतिनिधी) : साईबाबा संस्थानच्या २००० नंतरचे संस्थान आस्थापनेवरील ५९८ कंत्राटी कर्मचाऱ्यांना २००४ च्या अधिनियमानुसार संस्थान सेवेत कायम करण्यात यावे, अशी मागणी साईबाबा संस्थान असंघटित कर्मचारी संघटनेच्यावतीने राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आम्ही संस्थानचे विविध विभागांमध्ये २००१ ते २ जानेवारी २०२० पर्यंत ठेकेदारांमार्फत काम करीत होतो. परंतु श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थापनाने ३ जानेवारी २०२० पासून संस्थान आस्थापनेवर कुशल / अकुशल कंत्राटी कर्मचारी यांना देण्यात आलेले नियुक्ती आदेश जा.क्र. एसएसएस / सा प्रशा/ आस्था २२०० ( ०१ ते ६३१ /२०१९ दि. ०२ जानेवारी २०२० नुसार संस्थान आस्थापनेवर कंत्राटी पध्दतीने तात्पुरत्या स्वरूपात सामावून घेतले असून गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून श्री साईभक्तांना इमानदारीने व सचोटीने सेवा देत आहे तसेच वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत.
सन २००४ च्या अधिनियमानुसार २२ ऑगष्ट २००४ पर्यंतच्या कोणत्याही कर्मचाऱ्याची सेवा संरक्षित व नियमित असल्याची तरतुद आहे. त्यातीलच सन १९९४ ते २००० सालापर्यंतचे १ हजार ५२ कंत्राटी कर्मचाऱ्यांना संस्थानच्या सेवेत कायमस्वरूपी नियुक्ती देवून त्यांचे जीवनाला स्थैर्य दिले आहे. आज मितीस कुशल ११ हजार ५०० रुपये व अकुशल ९ हजार ५०० रुपये पगार मिळतो. सध्याचे महागाईच्या काळाचा विचार करता आम्हास इतके अल्पशा पगारामध्ये कुटूंबाचा उदरनिर्वाह करणे व कुटूंब प्रमुख या नात्याने कुटुंब चालविणे अशक्य झाले आहे. आम्ही केलेल्या १८ वर्ष ठेकेदारामार्फत व २ वर्ष संस्थान आस्थापनेवर केलेल्या एकूण २० वर्ष सेवेचा व आताच्या वयाचा विचार करता मानवतेच्या दृष्टीकोनातून सन २००० पर्यंतचे १०५२ कर्मचाऱ्यांप्रमाणे व २००४ च्या अधिनियमानुसार संस्थानमध्ये रिक्त झालेल्या जागेवर नियुक्त करण्याचे आपल्या स्तरावर आदेश द्यावे व श्री साईबाबा संस्थांनचे नियमित कामगार म्हणून सेवा करण्याची संधी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष महेंद्र कोते, उपाध्यक्ष दिपक तुरकणे, सचिव गोटीराम दाढे, कार्याध्यक्ष सुनील कोते, सुनील मांजरेकर, सहसचिव दत्तात्रय देवकर, महेश महाले, शरद मते, जयेश लाढवंशी, किरण कांदळकर, संदीप पवार, निलेश गोंदकर, अमोल राजूरकर, गोरक्ष सुरळे, बाळासाहेब बढे, ज्ञानदेव पाचपिंड, अशोक लोंढे, रामनाथ थोरात, गौतम पगारे, उमेश वाघ, राजेंद्र गोर्डे आदींच्या सह्या आहेत.






