राहुरीत ४० हजारांची लाच मागणारे एजंट गजाआड

अहमदनगर (प्रतिनिधी) : जातपडताळणी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, यासाठी दाखल करण्यात आलेल्या दाव्यात तक्रारदाराच्या बाजूने निकाल लावण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱया दोन एजंटांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. हबीब बाबूभाई सय्यद (वय ५२) व शकील अब्बास पठाण (वय ४३) अशी त्यांची नावे आहेत.

जातपडताळणी कार्यालयात तीन इसमांनी खोटे जातीचे दाखले काढून जातपडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केले होते. त्यांचे जातपडताळणी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये याकरिता तक्रारदाराने दावा दाखल केला होता. या दाव्याचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून देतो म्हणून हबीब सय्यद याने कार्यालयातील अधिकाऱ्यांना एक लाख द्यावे लागतील, असे सांगून लाचेची मागणी केली.

तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर १३ ऑक्टोबरला तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली. तडजोडीअंती ८० हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यातील ४० हजार रुपयांचा पहिला हफ्ता आज देण्यात येणार होता. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राहुरी येथील स्टेशन रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये सापळा रचून तक्रारदाराकडून ४० हजार रुपये स्वीकारताना सय्यद व पठाण यांना रंगेहाथ पकडले.

नगर लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर, पोलीस निरीक्षक प्रशांत सपकाळे, पोलीस नाईक रमेश चौधरी, हवालदार रवींद्र निमसे, वैभव पांढरे, चालक पोलीस हवालदार हारुन शेख यांनी ही कारवाई केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here