आग्रा (उत्तरप्रदेश) : चोरी झाल्यास माणूस पोलिसांकडे तक्रार घेऊन जातो, पण येथे तर चक्क पोलिस ठाण्यातच चोरी झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. उत्तरप्रदेशच्या आग्रामध्ये पोलिस ठाण्यातून थोडीथोडकी नव्हे तर २५ लाख रुपयांची रोकड चोरीला गेली आहे. याप्रकरणी स्टेशन प्रभारीसह पाच पोलिस कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले आहे. चोरी झाल्यानंतर जप्त केलेली रक्कम पोलिस ठाण्यात ठेवण्यात आली होती. तीच रक्कम मालकाकडे सुपूर्द करण्यापूर्वीच चोरी झाली आहे.
आग्राचे अतिरिक्त महासंचालक (एडीजी) राजीव कृष्णा यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी विकास कॉलनी, आग्रा येथील रहिवासी रेल्वे ठेकेदार प्रेमचंद यांच्या घरातून सोन्याची सात बिस्किटे आणि रोख रक्कम चोरीला गेली होती. या प्रकरणी १३ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी चोरीच्या आरोपावरून प्रेमचंदचा दूरचा नातेवाईक आणि जसवंत नगर इटावा येथे राहणार्या रोहितला अटक केली. त्याच्याकडून २४ लाख रुपये रोख आणि सोन्याची पाच बिस्किटे जप्त करण्यात आली. ही रोकड जगदीशपुरा पोलिस ठाण्याच्या मालखान्यात ठेवण्यात आली होती. जप्त केलेल्या २४ लाख रुपयांसह पोलिस ठाण्याच्या मालखान्यात आधीच ठेवलेली एक लाख रुपयांची रोकडही चोरट्यांनी चोरून नेली आहे.
राजीव कृष्णा यांनी जगदीशपुरा पोलिस ठाण्याच्या मालखान्यातून २५ लाख रुपये रोख चोरी गेल्या प्रकरणी निष्काळजी केल्यामुळे पोलिस ठाण्याचे प्रभारी अनूपकुमार तिवारी, उपनिरीक्षक राम निवास तसेच रात्री कर्तव्यावर असलेल्या तीन पोलिस कर्मचार्यांना निलंबित केले आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधीक्षक मुनीराज यांना चोरट्याला अटक करून २५ लाख रुपये लवकरात लवकर जप्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.






