काठमांडू (नेपाळ) : येथे आज भूकंपाचे दोन धक्के बसले. रिश्टर मापकावर या धक्क्यांची तीव्रता ४.७ इतकी होती. मात्र या भूकंपाच्या धक्क्यामुले कोणत्याही नुकसानीचे वृत्त त्वरित उपलब्ध होऊ शकले नाही, असे नेपाळच्या भूगर्भशास्त्र विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. आज दुपारी नेपाळच्या मध्य भागात हे भूकंपाचे धक्के जाणवले.
या भूकंपाच्या धक्क्यांचा केंद्रबिंदू राजधानी काठमांडूपासून ११४ किलोमीटर अंतरावर सिंधुपालचौक भागातील पानफंग येथे होता. यातील पहिला धक्का दुपारी १ वाजून १४ मिनिटांनी जाणवला. तर दुसरा धक्का याच ठिकाणी १ वाजून ५६ मिनिटांनी जाणवला असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या दोन्ही धक्क्यांची तीव्रता रिश्टर मापकावर ४.७ इतकी होती.
२०१५ च्या एप्रिल महिन्यात नेपाळमध्ये ७.८ रिश्टर क्षमतेचा जोरदार भूकंप झाला होता. त्यामधे किमान ९ हजार जणांचा मृत्यू झाला होता. तर २२ हजार जण जखमी झाले होते. त्या भूकंपात ८ लाख घरे आणि शालांच्या इमारतींचे नुकसान झाले होते.






