कोलकाता (पश्चिम बंगाल) : उत्तर दिनाजपूरच्या इटाहारमध्ये हल्लेखोरांनी गोळ्या झाडून भाजपाचे युवा नेते मिथुन घोष यांची हत्या केली असल्याची माहिती बंगालचे भाजपा नेते शुभेंदू अधिकारी यांनी दिली. मिथुन घोष यांच्या हत्येमागे तृणमूल काँग्रेसचा हात असल्याचा आरोप अधिकारी यांनी केला आहे.
मिथून घोष यांची हत्या करणार्यांना वेळ आल्यावर योग्य धडा शिकवला जाईल, असा इशारा अधिकारी यांनी दिला आहे. सोमवारी एका ट्विटमध्ये अधिकारी म्हणाले, मिथुन घोष यांची इटाहार येथे हल्लेखोरांनी हत्या केली. ही हत्या तृणमूल काँग्रेसने घडवून आणली आहे. वेळ आल्यावर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. बंगालमध्ये गेल्या काही काळात भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये सतत संघर्ष होत आहे. याच संघर्षातून राज्यात काही जणांच्या हत्या देखील झाल्या आहेत.






