पंचकुला : डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमला रणजीत सिंह हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याच्यासह ४ आरोपींना विशेष सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आलं. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने रणजीत सिंगच्या हत्येप्रकरणी राम रहीमसह ५ दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. राम रहीमला ३१ लाख आणि इतर ४ दोषींना ५० हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह साध्विंच्या लैंगिक शोषणात आधीच तुरुंगात शिक्षा भोगत आहे. १० जुलै २००२ रोजी रणजीत सिंह यांची हत्या झाली होती. या प्रकरणात गुरमीत राम रहीम सिंह दोषी आढळला आहे. सीबीआयने ३ डिसेंबर २००३ रोजी एफआयआर नोंदवला होता. २०१७ मध्ये सीबीआय कोर्टाने गुरमीत राम रहीमसह ५ लोकांना दोषी ठरवलं. राम रहीम व्यतिरिक्त, कृष्ण लाल, अवतार, सबदील आणि जसबीर यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.
कुरुक्षेत्रातील रहिवासी आणि डेराच्या उच्चस्तरीय व्यवस्थापन समितीचा सदस्य रणजीत सिंह यांच्या हत्या प्रकरणात गुरमीत राम रहीम, डेराचा तत्कालीन व्यवस्थापक कृष्ण लाल, अवतार, जसबीर आणि सबदील यांना पंचकुला येथील हरियाणा विशेष सीबीआय न्यायालयाने ८ ऑक्टोबर रोजी दोषी ठरवलं होतं. मारेकऱ्यांमध्ये पंजाब पोलिस कमांडो सबदील सिंग, अवतार सिंग, इंदरसेन आणि कृष्णलाल यांचा समावेश होता. रणजीत सिंहची हत्या केल्यानंतर मारेकऱ्यांनी वापरलेली शस्त्रे डेराच्या आश्रमात लपवली होती.
सीबीआयच्या विशेष न्यायालयात न्यायाधीश डॉ.सुशील कुमार गर्ग यांनी सुमारे अडीच तासांच्या चर्चेनंतर आरोपीला दोषी ठरवलं होतं. दरम्यान, यापूर्वीच गुरमीत राम रहीमला साध्वींच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात २० वर्षांची शिक्षा झाली आहे. याशिवाय तो पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.






