तेर पॉलिसी सेंटरच्या डॉ.कलाम यंग रिसर्च फेलोशिप प्रोग्रॅमचे उद्घाटन
पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : पर्यावरण संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या तेर पॉलिसी सेंटर या संस्थेच्या डॉ.कलाम यंग रिसर्च फेलोशिप प्रोग्रॅमचे उद्घाटन १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता ऑनलाईन पार पडले. इजिप्तमधील भारतीय राजदूत अजित गुप्ते यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले. संस्थेच्या संचालक डॉ.विनीता आपटे यांनी उपक्रमाची माहिती दिली. या उपक्रमाचे हे चौथे वर्ष आहे.
डॉ.कलाम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही फेलोशिप देण्यात येते.पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय संशोधन करणाऱ्या तरुण संशोधकांना ही फेलोशिप देण्यात येते. २० ऑक्टोबर पासून अर्ज करता येणार आहेत. http://www.drkalamfellowship.com या संकेतस्थळावर माहिती देण्यात आली आहे. २७ जुलै रोजी फेलोशिपची घोषणा आणि वितरण करण्यात येणार आहे.
उद्घाटन कार्यक्रमात बोलताना अजित गुप्ते म्हणाले, ‘ ग्लोबल वॉर्मिंग हा जगाला भेडसावणारा प्रश्न आहे. भारतातदेखील प्रदूषणाची समस्या, पाण्याचे साठे प्रदूषित होण्याची समस्या आहे. सरकारकडे अपेक्षा करण्याऐवजी आपल्या ठिकाणी हे प्रदूषण कसे थांबवता येईल, याकडे लक्ष देता येईल. तंत्रज्ञानाचा वापर या समस्या सोडाविण्यासाठी उपयुक्त ठरणार असून तेर पॉलिसी सेंटरचा हा फेलोशिप प्रोग्रॅम उल्लेखनीय ठरत आहे. या फेलोशिप प्रोग्रॅमचे ज्युरी अनिल अरोरा, सुनील शास्त्री देखील या वेळी उपस्थित होते.






