नाशिक (विशेष प्रतिनिधी) : येथील दूधबाजारात रात्री व्हाइटनरची नशा करणाऱ्या दोन मित्रांमध्ये वाद झाला. दोघे व्हाइटनर ओढत असताना संशयिताने व्हाइटनर ओढण्यास मागितले. मयत नितीन याने व्हाईटनर देण्यास नकार दिला. या रागातून संशयिताने खिशातून चाकू काढत नितीन गायकवाडच्या पोटात खुपसला. नितीनला परिसरातील नागरिकांनी तात्काळ रिक्षातून जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच उपायुक्त अमोल तांबे, यांच्यासह गुन्हे शाखा युनिट १ चे विजय ढमाळ, मध्यवर्ती गुन्हे शाखेचे आंचल मुदगल यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ निरीक्षक संभाजी निंबाळकर, दत्ता पवार यांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत मयताच्या घरचा पत्ता शोधला. तो भारतनगर येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, हल्ला करणाऱ्या संशयिताला नागरिकांनी पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो जमावाच्या तावडीतून सुटून पळण्यात यशस्वी झाला. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.






