पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : चाकण शहर आणि परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून चोरट्यांचा मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ सुरू आहे. रात्री-अपरात्री किंवा भरदिवसा चोरटे बनावट चावीचा वापर करून वाहने लांबवित असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. एकाच दिवसात दोन दुचाकी व एक पिकअप चोरीला गेल्याची घटना समोर आल्याने नागरिकांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
उद्योजक अनिल गोपाळ गोसावी (वय ५४, रा. मुटकेवाडी) यांची मोटारसायकल (एमएच १४ एफआर २६३८) चोरांनी बनावट चावीचा वापर करून लंपास केली. तसेच खराबवाडी येथील बापू कैलास कड (वय २७) यांची दुचाकी (एमएच १४ एचए ७०००) घरासमोरून चोरुन नेली.
चाकण येथील तिसऱ्या घटनेत महिंद्रा बोलेरो पिकअप (एमएच १४ ईएम ७०८६) लॉक करुन पार्क केली होती. ती चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी ओमप्रकाश सुजाराम जाट (वय ४२) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चाकण पोलीस पुढील तपास करत आहेत.






