मुंबई (महाराष्ट्र उपसंपादक प्रशांत भिसे)
महाराष्ट्राचा पोलीस विभाग म्हणजे केवळ परमवीर सिंग किंवा सचिन वाझे, असे समीकरण काहींच्या डोक्यात फिट्ट बसलेले असू शकते! परंतु या विभागात जशा अपप्रवृत्ती आहेत वा असतात, तसेच चांगले अधिकारी आणि पोलीसदेखील आहेत, असतात. रिबेरो, सराफ, सोमण, मेढेकर, अरविंद इनामदार, वाय सी पवार, मीरा बोरवणकर, सुराडकर, धनराज वंजारी अशा कितीतरी जणांची नावे आजही अत्यंत आदराने घेतली जातात.
ही झाली उच्चपदावरील व्यक्तींची नावे. परंतु कनिष्ठ पातळीवरील अधिकारी व पोलीसही नेकीने काम करत असतात. आजदेखील अनेक पोलीस हे जिवाची बाजी लावून आपले कर्तव्य पार पाडत आहेत. कधीकधी उन्मत्त कारवाले हे ट्रॅफिक पोलीसाने अडवले, तरीही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पोलीसालाच बोनेटवरून फरपटत नेण्याच्या घटना घडलेल्या आहेत. ट्रॅफिक पोलीसच्या अंगावरही गाड्या घडणारे मस्तवाल लोक आहेत.
अलीकडे मुंबईच्या ना म जोशी मार्गावर एक थरारक घटना घडली. एक माणूस हातात कोयता घेऊन अरेरावी करत होता. त्याची मुले त्याला अडवत असतानाही तो घरात व बाहेर धुमाकूळ घालतच होता. कंट्रोल रूमला या संबंधीची तक्रार प्राप्त झाली. त्यानंतर लगेच ना म जोशी मार्गावरील पोलीस ठाण्यात फोन आला आणि तो येताच तात्काळ एक पथक जागेवर रवाना झाले. त्या कोयताधारी माणसाला आवरायचे कसे, असा प्रश्न होता. जोखीमही होती, कारण त्या माणसाचे डोके ठिकाणावर नव्हते. अशावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे यांनी एका पोलीसाला या घटनेचे व्हिडिओ शूटिंग करायला सांगितले आणि त्याचवेळी त्या माणसास समजावण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. परंतु आपले व्हिडिओ शूटिंग होत आहे, हे बघताच त्या व्यक्तीचे माथे आणखीनच फिरले. तो त्या पोलीसांच्या दिशेने कोयता घेऊन धावत सुटला. त्याबरोबर प्रसंगावधान दाखवून आणि कोणतेही भय न बाळगता वायदंडे यांनी आरोपीला पकडले आणि दोन्ही हातांनी त्याला आवळले.
त्यावेळी वायदंडे यांनाही कोयत्याच्या काही जखमा झाल्या. परंतु त्यांचे इतर सहकारी धावत आले आणि त्यांनी त्या आरोपीला पकडले, नि:शस्त्र केले आणि दोरीने बांधून नंतर त्याच्यावर पुढील कारवाई केली. सात वर्षांपूर्वी मुंबईतच वडाळा येथे एका सराईत गुन्हेगाराचा पाठलाग करत असताना वायदंडे यांचा पाय छपरावरून खाली घसरला आणि ते वरून खाली पडले. त्यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आणि त्यांना बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागले. परंतु तरीदेखील कोणत्याही प्रसंगाचा सामना करण्यास ते सज्ज असतात. गुन्हेगारांचा, गुंडांचा ते नीडरपणे सामना करतात. अर्थात त्यांच्यासारख्या अधिकाऱ्यांना इतर पोलिसांचीही साथ असते.
वायदंडे यांना वाचनाची प्रचंड आवड आहे आणि कोणताही लेख वा पुस्तक आवडले की ते आवर्जून दाद देतात. पोलीसात अशी खूप माणसे आहेत म्हणून या खात्याबद्दल आदरच बाळगला पाहिजे. या खात्यातील काही जणांची प्रतिमा वादग्रस्त असली, तरी बहुसंख्य पोलीस अधिकारी व पोलीस हे प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत असतात. म्हणूनच काही व्यक्तींच्या पायी अवघ्या खात्याला बदनाम केले जाऊ नये, असे वाटते. शरद वायदंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा!






