विवाहित मामेबहीणीवर अत्याचार करणारा भाऊ जेरबंद

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : येथून जवळच असणाऱ्या तळेगाव परिसरात एका तरुणाने आपल्या विवाहित मामेबहिणीवर तब्बल अडीच वर्षे अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पीडित महिलेवर बलात्कार करतानाचे व्हिडीओ पतीला दाखवण्याची धमकी देत आरोपीनं पीडितेवर अनेकदा अत्याचार केला आहे. गेल्या अडीच वर्षांपासून आरोपी आपल्याच मामेबहिणीचं लैंगिक शोषण करत होता. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर ३४ वर्षीय पीडित बहिणीने आपल्या आतेभावाविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे.



पीडित बहिणीच्या तक्रारीनंतर, तळेगाव पोलिसांनी आरोपी आतेभावाविरोधात बलात्कारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी तरुणाला पोलिसांनी अद्याप अटक केली नसून या घटनेचा तपास केला जात आहे.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकेदिवशी आरोपी आतेभाऊ पीडितेच्या घरी आला होता. यावेळी पीडित महिलेचा नवरा घरी नव्हता. घरी नवरा नसल्याची संधी साधून आरोपी आतेभावानं पीडित महिलेवर बळजबरी करत, तिच्यावर बलात्कार केला. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने फिर्यादीवर बलात्कार करतानाचा व्हिडीओ आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला. यानंतर आरोपीनं संबंधित व्हिडीओ पीडितेच्या नवऱ्याला आणि नातेवाईकांना दाखवण्याची धमकी दिली. यानंतर घाबरलेल्या विवाहित बहिणीवर आतेभावानं अनेकदा बलात्कार केला आहे.



गेल्या अडीच वर्षांपासून भाऊ पीडितेला त्रास देत होता. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेनं तळेगाव पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्कारासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीनं जानेवारी २०१९ पासून जून २०२१ पर्यंत अनेकदा बलात्कार केल्याचं फिर्यादीनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here