अहमदनगर (प्रतिनिधी) : पारनेर तालुक्यात एका तरुणीचा मृतदेह तिच्याच घरात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तरुणीवर अत्याचार करुन तिचा खून केल्याचा संशय आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलं आहे.
तरुणीवर अत्याचार करुन तिच्या तोंडात बोळा कोंबून खून केल्याचा पोलिसांना संशय आहे. ही तरुणी घरात एकटीच असताना हा प्रकार घडल्याच समोर आलंय. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु करण्यात आलाय. तर या प्रकरणी काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून कसून चौकशी केली जातेय.
या तरुणीचे आईवडील दोघेही रोजंदारीने कामाला जातात. यावेळी मुलगी घरात एकटी होती. क्लासला गेलेला तिचा भाऊ घरी आला तेव्हा त्याची बहीण घरात झोपलेली होती. ती प्रतिसाद देत नसल्याचं पाहून त्याने बाहेर येऊन आरडाओरड केला. त्यावेळी आजुबाजूचे लोक धावत आले. त्यांनी मुलीला जवळच्या एका खासगी रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. याप्रकरणी शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह पाठवण्यात आला असून अहवाल आल्यानंतर मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होणार आहे. मात्र पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.






