भुसावळ (तालुका प्रतिनिधी गिरीश पवार) : बुधवारी विधी सेवा समिती तर्फे पॅन इंडिया अवेरनेस अँड आऊटरीच या कार्यक्रमाअंतर्गत तालुका विधी सेवा समिती भुसावळ व भुसावळ तालुका वकील संघाच्या वतीने कायदा व शासन योजनांची माहिती देण्यात आली.
संविधानात कायद्याच्या दृष्टीने सर्व नागरिक समान आहेत. कायद्याची अंमलबजावणी योग्यरीत्या होण्यासाठी पोलीस खाते हे एक माध्यम आहे . कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न आमच्याकडून होत असतो असे प्रतिपादन तालुका पोलिस निरीक्षक विलास शेंडे यांनी आज विधी सेवा समिती मार्फत आयोजित शिबिरात केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त इंडिया अवरणेस अँड आऊट हा उपक्रम विधी सेवा समितीतर्फे राबविला जात आहे. त्या अंतर्गत आज कुऱ्हा पानाचे येथील ग्रामपंचायत कार्यालयात कायदेविषयक शिबीर आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरपंच श्री.जीवन पाटील हे होते. शिबिराचे प्रमुख अतिथी म्हणून तालुका पोलिस निरीक्षक श्री.विलास शेंडे हे उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून अॅड अभिजीत मेने यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. त्यांनी राष्ट्रीय मानव अधिकार आयोग व त्या संबंधित असलेले कलम सविस्तर व सोप्या पद्धतीने ग्रामस्थांना समजावून सांगितले.वकील संघाकडून उपस्थित असलेले महिला प्रतिनिधी ॲड. जास्वंदी भंडारी यांनी नुकताच पारित झालेला शासन निर्णय “मिशन वात्सल्य” व इतर योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली व युवा पिढी समाज माध्यमांमुळे भरकटत जात आहे याकडे माता-पित्यांनी लक्ष द्यावे असे आवाहन केले. जळगाव येथील विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी सुजाता वाघोदे हिने असिड अटॅक या विषयावर मार्गदर्शन केले. शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांबद्दल विस्तृत मार्गदर्शन व माहिती देशमुख कम्प्युटर चे संचालक श्री अनिस देशमुख यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमांगी धांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ नागरिक श्री कालिदास कळसकर सर यांनी केले. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य ,ज्येष्ठ नागरिक , आशा सेविका,समाज सेवक , अंगणवाडी सेविका, विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.






