भुसावळात म्युनिसिपल कॉम्प्लेक्सचा सज्जा कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली

म्युनिसिपल कॉम्प्लेक्स

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रमोद रुले) | शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेतील नगरपालिकेच्या सुमारे ५० वर्षे जुन्या म्युनिसिपल कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या मजल्यावरील जीर्ण सिमेंट काँक्रीटचा सज्जा गुरुवारी (१५ ऑक्टोबर २०२६) सकाळी ११ वाजेच्या सुमारास अचानक कोसळला. अचानक झालेल्या मोठ्या आवाजामुळे व धुराच्या लोटांमुळे परिसरातील व्यावसायिक आणि नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली. सुदैवाने, बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी सुरू होण्यापूर्वीच ही दुर्घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला व कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, खाली उभ्या असलेल्या एका चारचाकी वाहनासह दोन दुचाकींचे यात नुकसान झाले आहे. या घटनेमुळे नगरपालिकेच्या मालकीच्या जुन्या व्यापारी संकुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

 

महात्मा गांधी संकुलातही घडली होती अशीच दुर्घटना

जुन्या व्यापारी संकुलांच्या दुरवस्थेचा प्रश्न यापूर्वीही समोर आला आहे. ११ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोरील डी.एस. हायस्कूलला लागून असलेल्या ‘महात्मा गांधी संकुला’च्या वरच्या मजल्यावरील जीर्ण पॅरापेटचा काही भाग दुकानांच्या छतावर कोसळला होता. त्या घटनेतही जीवितहानी झाली नव्हती, मात्र एका दुचाकीचे नुकसान झाले होते. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे

मध्यवर्ती बाजारपेठेतील हे म्युनिसिपल कॉम्प्लेक्स सुमारे ५० वर्षांपूर्वी बांधण्यात आले असून २५ ते ३० वर्षांपूर्वी त्यावर दुसरा मजला बांधण्यात आला होता. या मजल्यावरील पॅरापेटचा भाग अत्यंत जीर्ण झाल्याने तो अचानक खाली कोसळला. ‘वैशाली प्रोव्हिजन स्टोअर्स’ या दुकानाच्या वरील भागातील सिमेंट काँक्रीट खाली पडल्याने मोठा आवाज झाला आणि सर्वत्र धुळीचे लोट पसरले.

सध्या सणासुदीचे दिवस असल्याने बाजारपेठेतील दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू असतात, त्यामुळे सकाळी दुकानदारांची व ग्राहकांची गर्दी होण्यास उशीर होतो. ही घटना घडली तेव्हा परिसरात वर्दळ नव्हती, ज्यामुळे जीवितहानी टळली. काँक्रीटचे तुकडे शेजारील सोडा विक्रेत्याच्या चारचाकी वाहनावर पडल्याने त्याचे किरकोळ नुकसान झाले, तर दोन दुचाकींचेही नुकसान झाले आहे.

म्युनिसिपल कॉम्प्लेक्स शेजारील स्व. छबीलदास काळू चौधरी कापड मार्केट तसेच छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाचीही अवस्था दयनीय झाली आहे. या संकुलांमध्ये दररोज हजारो नागरिक व व्यापाऱ्यांची ये-जा असते, त्यामुळे नगरपालिकेने तातडीने या जीर्ण संकुलांचे ऑडिट करून त्यांची दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here