रास्ता पेठ, आंबेगावमध्ये घरफोडी; पाच लाखांचे दागिने लंपास

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : शहरात घरफोडीचे सत्र कायम असून चोरट्यांनी रास्ता पेठेत घरातून २ लाख ६१ हजारांचे दागिने लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. कात्रजमधील आंबेगाव परिसरात घराचे कुलुप तोडून २ लाख ५२ हजारांचा ऐवज लांबविण्यात आला. याबाबत संबंधित रहिवाशांनी समर्थ आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार महिलेचे माहेर रास्ता पेठेत असून त्यांनी घरातील एका डब्यात दागिने ठेवले होते. २० ऑक्टोबरला दुपारी चारच्या सुमारास घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्याने २ लाख ६१ हजारांचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुरेश चौधर तपास करत आहेत. दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी दरवाजा तोडून अडीच लाखांचा ऐवज लंपास केला.

ही घटना १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर कालावधीत कात्रज परिसरातील आंबेगावमधील सोसायटीत घडली. याबाबत महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला आंबेगाव परिसरातील टेल्को कॉलनीतील साई आंगणे सोसायटीत राहायला आहेत. १५ सप्टेंबरला त्या बाहेरगावी गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलुप तोडून २ लाख ५२ हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक धामणे तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here