अहमदनगर (प्रतिनिधी) : अमेरिकेतील वास्तव्यात विमा कंपनीकडून उतरविलेल्या ३७ कोटी रुपयांच्या (५० लाख डॉलर) विम्याची रक्कम मिळविण्यासाठी येथील एका व्यक्तीने स्वत:ला मृत दाखविण्यासाठी एका मनोरुग्ण व्यक्तीला सर्पदंश करून ठार मारले. मात्र पोलीस आणि विमा कंपनीच्या चौकशीत विमा धारक व्यक्ती जिवंत असल्याचे समोर आले. अकोले तालुक्यातील राजूर येथे २२ एप्रिल २०२१ रोजी ही घटना घडली होती. या गुन्ह्यातील एकूण पाच आरोपींना अटक केल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.
मुख्य आरोपी प्रशांत रामहरी चौधरी याच्यासह प्रभाकर भिमाजी वाघचौरे, संदीप तळेकर, हर्षद रघुनाथ लहामगे, हरिश रामनाथ कुलाळ यांना अटक केली आहे. वाघचौरे २० वर्षांपासून अमेरिकेत राहत होता. तेथे तो हॉटेलमध्ये कूक म्हणून काम करत होता. जानेवारी २०२१ मध्ये तो भारतात आला. त्यानंतर तो अकोले तालुक्यातील धामणगावपाट येथे त्याच्या सासुरवाडीला राहत होता. अमेरिकेत असताना वाघचौरे याने ऑल स्टेट इन्शुरन्स कंपनीचा ३७ कोटी ५७ लाख रुपयांचा जीवन विमा उतरविला होता.
विम्याचे पैसे मिळविण्यासाठी त्याने त्याचे नातेवाईक संदीप तळेकर आणि प्रशांत चौधरी यांना विश्वासात घेऊन सात महिन्यांपूर्वी कट रचला. ठरल्याप्रमाणे वाघचौरे आणि त्याच्या साथीदारांनी धामणगाव आवारी येथील मनोरुग्ण नवनाथ यशवंत आनप (५०) यास २२ एप्रिलला राजूर परिसरात आणून सर्पदंश केला. आनप हे मृत झाल्यानंतर त्यांना राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून त्यांचे शवविच्छेदन करून घेतले. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. राजूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर विम्याचा दावा दाखल केला होता.
२०१७ मध्ये पत्नीचा अपघाती मृत्यू झाल्याचे खोटे कागदपत्रे सादर करून त्याने दावा केला होता. मात्र त्याचा खोटारडेपणा समोर आला होता. त्यानंतर वाघचौरेने पुन्हा दावा केल्याने संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना संशय आला. चौकशी अधिकारी पंकज गुप्ता यांनी राजूर पोलिसांशी संपर्क केला. त्यानंतर चौकशीत गुन्हा उघडकीस आला.






