पंजाबच्या बारावी पास तरुणाचा पुण्यात एटीएम फोडण्याचा प्रयत्न

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : जिल्ह्यातील चाकण-तळेगाव रोडवर असलेल्या जी पी पारसिक सहकारी बँकेचे एटीएम चोरीच्या उद्देशाने फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवार २५ ऑगस्टला सकाळी सव्वाआठ वाजता घडली होती. पोलिसांनी पंजाबमधील टोळीतील तिघा जणांना जेरबंद केलं आहे. लखवीरसिंग बलदेवसिंग, रमेशकुमार लाजपत्राय चावला, सिंधरसिंग मख्खनसिंग गगू अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

चाकण-तळेगाव रोडवर तळेगाव स्टेशनमध्ये जी पी पारसिक सहकारी बँक आहे. त्या बँकेच्या शेजारी एटीएम आहे. आरोपी लखवीरसिंग याने एटीएम सेंटरमध्ये घुसून स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. त्याच्या दोन साथीदारांनी त्याला मदत केली. हा प्रकार एटीएममधील सुरक्षारक्षकाच्या लक्षात आल्याने त्यांनी त्या चोराला एटीएममध्ये बंद करुन तात्काळ तळेगांव दाभाडे पोलिसांना बोलवलं.

एटीएमबाहेर दोन आरोपी हे पाळत ठेऊन बसले होते. पोलीस घटनास्थळी येताच त्याच्या हालचाली बदलल्या. त्यामुळे पोलिसांनी आधी बाहेरील आरोपींना ताब्यात घेतलं आणि नंतर एटीएममधील आरोपीला ताब्यात घेत चौकशी सुरू केली असता धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे.

हे आरोपी गुन्हा करताना एटीएम मशीनमध्ये ज्या ठिकाणी गुप्त पासवर्ड टाकण्यात येतो, त्या ठिकाणाच्या वरील बाजूस कॅमेरा, सिमकार्ड आणि मेमरी कार्ड असलेले एक छोटे डिवाइस लावत. हे डिवाईस मोबाईलद्वारे ऑपरेट करत. एटीएम मशीनमध्ये बँकेचे कर्मचारी ज्यावेळेस पैसे भरत असतात, त्यावेळी टाकला जाणारा पासवर्ड संबंधित डिवाइसमध्ये रेकॉर्ड होत होता. मग तो पासवर्ड पाहून हे आरोपी संबंधित एटीएममध्ये चोरी करत असत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here