नाशिकमध्ये क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणारे दोन जण ताब्यात; ५ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

नाशिक (विशेष प्रतिनिधी) : टी २० वर्ल्ड कप सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. वसीम रशीद शेख (४०, रा. गाडेकर मळा, देवळाली गाव) आणि अमोल शिवाजी नागरे (३२, रा.दत्तनगर, पंचवटी) असे या दोघा संशयितांची नावे आहेत. दोघेही दुचाकीवर बसून सट्टेबाजी करत असल्याचे आढळून आले आहे.

पोलिस अंमलदार देवकिसन गायकर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे देवळालीगावात वसीम शेख हा सट्टेबाजी करत असल्याचे समजले. विशेष म्हणजे तो बंदिस्त खोलीत न बसता सार्वजनिक ठिकाणी दुचाकीवर बसून सट्टेबाजी करत असल्याचे समजले.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून पाहणी केली असता वसीम व अमोल हे दोघे लोकांकडून पैसे घेत सट्टा लावत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडील चौकशीत विजय नंदवाणी याच्या सांगण्यावरून कमीशन घेत सट्टेबाजी करत असल्याचे समोर आले. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत त्यांच्याकडून ३ लाख ४८ हजार रुपयांची रोकड, दोन दुचाकी, एक नोंदवही असा ५ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अभिजीत सोनवणे, उपनिरीक्षक विजय लोंढे, सहायक उपनिरीक्षक भामराव भोसले, अंमलदार गायकर, शंकर काळे, प्रकाश भालेराव, सुगन साबरे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here