परमबीर सिंग बेल्जियममध्ये आहेत, काँग्रेस नेते संजय निरुपम यांचा दावा

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे सध्या बेल्जियममध्ये असल्याचा दावा काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी केला आहे. यासोबतच निरुपम यांनी परमबीर सिंग यांना पळून जाण्यास कोणी मदत केली? असा सवालही केला आहे.

मनी लॉड्रिंगप्रकरणी परमबीर सिंग गेल्या अनेक महिन्यांपासून बेपत्ता आहेत. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीजचे परमबीर सिंग यांना अनेकवेळा चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र, ते अद्याप हजर झाले नाहीत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर परमबीर सिंग यांच्याविरोधात देखील आरोप झाले. त्यावरुन ठाणे कोर्टात देखील परमबीर सिंग यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जाहीर केले होते.

काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले की, हे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आहेत. आता ते बेल्जियममध्ये आहेत असे समजते. ते बेल्जियमला गेले कसे?त्याला सेफ पॅसेज कोणी दिला? आपण अंडरकव्हर पाठवून त्यांना आणू शकत नाहीत?

परमबीर सिंग यांना त्यांच्या चंदीगड येथील निवासस्थानी अनेक पत्र पाठवण्यात आली होती. आणि त्यांचा ठावठिकाणा विषयी विचारणा करण्यात आली होती. मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही मागील महिन्यात गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आयपीएस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी अखिल भारतीय सेवा (आचार) नियमांच्या तरतुदींचा विचार करत असल्याचे सांगितले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here