नाशिक परिक्षेत्रात तब्बल चार कोटींचा गांजा, ब्राऊन शुगर, चरसचा साठा जप्त

नाशिक (विशेष प्रतिनिधी) : नाशिक परिक्षेत्रातील धुळे- नंदुरबार जिल्ह्यातील डोंगराळ भागातून गांजाची बेकायदेशीर शेती उद्ध्वस्त करण्यात आल्या आहे. विशेष म्हणजे त्यापैकी काही ठिकाणी वनविभागाच्या जमिनीवरच गांज्याची शेती सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत ४ कोटी रुपयांचा गांज्या, ब्राऊन शुगर, चरस असा एनडीपीएस गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रात आठ ठिकाणी गांजाची शेती नष्ट करण्यात आली आहे, तर युवकांना बेकायदेशीरपणे हत्यार विकणार्‍या मुख्य आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी दिली आहे.

नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांनी शनिवारी नाशकात पत्रकार परिषद घेऊन मागील दोन महिन्यांत केलेल्या धडाकेबाज कारवाईची माहिती दिली. यावेळी नाशिकचे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जळगावचे एसपी प्रवीण मुंढे, अहमदनगरचे एसपी मनोज पाटील व धुळ्याचे एसपी प्रविणकुमार पाटील यांच्यासह नंदूरबारचे एसपी व अन्य अधिकारी उपस्थित होते.

गेल्या दीड ते दोन महिन्यात उपमहानिरीक्षक डॉ. शेखर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविताना पथकाने चरस, गांजा आणि ब्राऊन शुगरचा साठा हस्तगत केला. ब्राउन शुगरचा ५०० ग्रॅम साठा हस्तगत करण्यात यश आले असून आंतरराज्य मार्गावरील अंमली पदार्थाच्या तस्करी सोबतच उत्तर महाराष्ट्रात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात गांज्याची शेती सुरू असल्याचे उघड झाले. केवळ खासगी जागेवर नव्हे तर काही भागात थेट वनविभागाच्या सरकारी जमिनीवर गांज्याची शेती सुरु असल्याने सिद्ध झाले असून तरुणांना बेकायदेशीरपणे शस्त्रास्रे विकणार्‍या मुख्य संशयिताला अटक करण्यात आली आहे. हत्यार विक्री करणारा मुख्य सराईत सतनामसिंग याला अटक करण्यात आली आहे.

या कारवाईत ५,१६५ किलो गांजा, ५०० ग्रॅम ब्राऊन शुगर, ४८१ ग्रॅम चरस आणि वाहने असा तब्बल ४ कोटी ६० लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नंदूरबार, अहमदनगर, नाशिक या पाच जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात केलेल्या कारवाईत ५१६५ किलो गांजा, ५०० ग्रॅम ब्राऊन शुगर, ४८१ ग्रॅम चरस आणि वाहने असा तब्बल ४ कोटी ६० लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात २२ गुन्हे दाखल करुन ३९ संशयितांना अटक करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार व धुळे या दोन जिल्ह्यांमध्ये चोरून गांजाची शेती केली जात होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here