ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : अॅसिड टाकून जिवे मारण्याची धमकी देऊ न वारंवार अत्याचार करणाऱ्या आरोपीला तुरुंगात धाडण्यात आले. ही उत्तम कामगिरी पोलीस निरीक्षक (गुन्हे) बापूसाहेब बागल यांच्या मार्गदर्शनाखाली मालाड पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात केली, अशी माहिती तपासी पोलीस पथकाने दिली.
१६ वर्षीय मुलगी आजीसोबत राहत असून, उदरनिर्वाहासाठी आजी मालाडमधील मार्केट फेरीचा व्यवसाय करते. या कामात १६ वर्षीय मुलगीही आजीला मदत करते. दरम्यानच्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच राज्य सरकारने निर्बंध शिथील केले. त्यामुळे नियमांनुसार आजीने पुन्हा काम सुरू केले. याच मार्केटमध्ये मोहमद कौसर (३२) याचाही व्यवसाय होता. मात्र कौसर याची आजीच्या नातीवर वाईट नजर होती.
पावसाळा सुरू झाल्याने शेख यानेही पावसाळी साहित्य विक्री सुरू केली. जुलै २०२१ महिन्यात नेहमीप्रमाणे आजीची नात मदतीसाठी मार्केटमध्ये आली. त्यावेळी शेख याने मुलीवर अत्याचार करण्यासाठी कट रचला. मार्केटमधील दीक्षित बंगल्यामध्ये साहित्य ठेवले आहेत. त्यापैकी काही साहित्य तुम्हाला घेऊन जा, असे शेख याने आजीला सांगितले. सदर साहित्य नेण्यासाठी आजीने मुलीला बंगल्यात जाण्यास सांगितले. त्यावेळी संधी साधून शेखही मुलीच्या मागे गेला. त्याने मुलीला जबरदस्तीने बंगल्यात नेले. तिथे मुलीवर अत्याचार केला.
‘माझी पोलिसांसोबत ओळख आहे’, ‘अत्याचार केल्याचे कोणालाही सांगितल्यास जिवे मारेल’ असे शेख याने पीडित मुलीला धमकावले. घाबरून पीडित मुलगी गप्प बसली. दरम्यान, आॅगस्ट महिन्यात आरोपीने अॅसिड टाकून जिवे मारण्याची धमकी देऊन शेख याने पीडित मुलीला पुन्हा दीक्षित बंगल्यात नेले व तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलगी आपल्या जाळ्यात अडकली, असा समज करून शेख तिचा वारंवार उपभोग घेण्यासाठी धमकावू लागला. नेहमीच्या अत्याचाराला वैतागून पीडित मुलीने हिंमत करून १०० नंबरवर घडलेला प्रसंग सांगितला.
दरम्यान, मुंबई पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षातून माहिती प्राप्त होताच निर्भया पथकाने पीडित मुलीशी संपर्क साधला. पीडित मुलीला विश्वासात घेऊ न पोलीस ठाण्यात आणले. तिचा जबाब नोंदवून मालाड पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली, तर दुसरीकडे परिमंडळ ११ चे उपायुक्त विशाल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय लिगाडे, पोलीस निरीक्षक(गुन्हे) बापूसाहेब बागल, निर्भया पथकातील महिला पोलीस उपनिरीक्षक मनीषा कागलकर, पोलीस उपनिरीक्षक धर्मराज रेडेकर, महिला पोलीस अंमलदार मकासरे, अंमलदार सांगळे यांनी अवघ्या अर्ध्या तासात आरोपी मोहमद कौसर याच्या मुसक्या आवळल्या. त्याची कसून चौकशी केली असता त्याने मुलीवर अत्याचार केल्याची कबुली दिली. या प्रकरणात आरोपी शेखला अटक करण्यात आली असून, पुढील तपास मालाड पोलीस करत आहेत.






