आयएएस अधिकाऱ्याच्या घराच चोरी, लक्ष्मी पुजनासाठी ठेवलेले दीड किलो सोन्याचे दागिने लंपास; प्रचंड खळबळ

thief

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : येथील मुंढवा परिसरात राहणार्‍या महसूल विभागातील एका सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकार्‍याच्या घरात धाडसी चोरी झाली आहे. सेवानिवृत्त अधिकार्‍याचा मुलगा आयएएस अधिकारी असून सध्या त्यांची नियुक्ती जम्मू-काश्मीरमध्ये आहे अशी माहिती समोर आली आहे.

चोरटयांनी लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच रात्री साडेआकरा ते पाडव्याच्या पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान लक्ष्मी पूजनामध्ये ठेवलेले तब्बल १५० तोळे वजनाचे म्हणजेच तब्बल दीड किलो सोन्याचे दागिने आणि अडीच लाख रूपये असा एकुण ४३ लाख ५० हजार रूपयाचा ऐवज लंपास केला आहे.

याप्रकरणी दत्तात्रय संभाजी डोईफोडे (६४, रा. ज्ञानेश्वरी बंगला सर्व्हे नं. ५५, प्लॉट नं. २४, डेक्कन पेपरमिल रोड, मुंढवा) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डोईफोडे हे महसूल विभागातून मोठया पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचे चिरंजीव सागर दत्तात्रय डोईफोडे हे आयएएस अधिकारी असून सध्या त्यांची नेमणूक जम्मू-काश्मीरमध्ये आहे. गुरूवारी लक्ष्मी पूजन असल्याने दत्तात्रय डोईफोडे यांनी घरातील जवळपास सर्वच पारंपारिक दागिने पूजनामध्ये ठेवले. त्यामध्ये मंगळसूत्र, नेकलेस, मोहनमाळ, बांगडया, तोडे, ब्रेसलेट, पाटल्या तसेच हिर्‍याचे सेट आणि रोख रक्कम २ लाख ५० हजार रूपयांचा समावेश होता. एकुण १५० तोळे वजनाचे दागिने आणि २ लाख ५० हजार रूपये रोख असा एकुण ४३ लाख ५० हजार रूपयांचा ऐवज पुजनामध्ये ठेवण्यात आला होता.

डोईफोडे यांचे घर गुरूवारी रात्री ११.३० ते शुक्रवारी पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान कुलूप लावून बंद होते. त्यावेळी चोरटयाने बंगल्याचे गेटचे कुलूप तोडून व हॉलचे खिडकीचा गज कापून आत प्रवेश केला. आणि पूजनामधील सर्व दागिने आणि रोख रक्कम असा एकुण ४३ लाख ५० हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. मुंढवा पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि गुन्हे शाखेचे अधिकारी चोरटयांचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here