पुण्यात २९ वर्षाच्या विवाहितेला गोठयात डांबून केला सामूहिक बलात्कार

gang-rape

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : जिल्ह्यातील भोर तालुक्यातील भांबवडे गावात एका २९ वर्षाच्या विवाहित महिलेवर गावातील दोन तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित महिलेचा पती रुग्णालयात उपचार घेत असताना नराधमांनी डाव साधला. पीडित महिलेला गोठ्यात डांबून ठेवत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला असून पीडित महिलेने शनिवारी (दि.७) फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध बलात्कारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन अनिल वाडकर, महेश सोनवणे आणि हनुमान कापरे (रा. भांबवडे) या तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

पीडित महिलेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित घटना १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली आहे. यावेळी पीडित महिलेचे पती शिरवळ येथील एका रुग्णालयात उपचार घेत होते. त्या दरम्यान फिर्यादी शेतात जाताना आरोपींनी फिर्यादीच्या पतीने मोबाईल चार्जर व पँट मागितल्याचे सांगितले. त्यावर स्वत: जाऊन देईन असे पीडितेने सांगितल्याचा राग आल्याने आरोपींनी तिला धमकी देऊन निघून गेले.

या प्रकारामुळे फिर्यादी घाबरुन शेतातील पिकात लपून बसल्या. सायंकाळी सहा वाजता घरी जाताना गुरांना चारा घालण्यासाठी गोठ्यात गेल्या. त्यावेळी अनिल वाडकर व महेश सोनवणे यांनी गोठ्यात येऊन पीडितेवर जबरदस्तीने सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी पीडित महिलेने शनिवारी (दि.७) स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली आहे.

पीडित महिलेने फिर्याद दिल्यानंतर आरोपींच्या पत्नीने पीडितेच्या नवऱ्याविरोधात बलात्काराची तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी फिर्यादी महिलेच्या पतीला ताब्यात घेतले आहे. आरोपीने ऑक्टोबर २०२० ते ५ नोव्हेंबर या कालावधीत भांबवडे आणि कापूरहोळ येथील लॉजमध्ये नेत जबरदस्तीने बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास राजगड पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here