मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : क्रूझ ड्रग्ज प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. या प्रकरणी एनसीबी, मुंबई पोलिस आणि एनसीबीची एसआयटीदेखील चौकशीस उतरले आहेत. दरम्यान, याप्रकरणी आता बाॅलीवूड अभिनेता शाहरूख खान यांच्या मॅनेजर पूजा ददलानी यांना मुंबई पोलिसांकडून समन्स बजावण्यात आला आहे. ददलानी यांना शनिवारी चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलं होतं. परंतु, पूजा ददलानीनं प्रकृतीचे कारण देत मुंबई पोलिसांकडे वेळ मागून घेतला आहे.
मुंबईतील लोअर परेलमधील फिनिक्स मॉल परिसरात एनसीबीचं एक पथक दाखल झालं आहे. या ठिकाणीच पूजा दादलानी आणि किरण गोसावी यांच्यात पैशांच्या देवाण-घेवाणीबाबत चर्चा झाल्याचा संशय आहे. यापूर्वी शाहरूख खानची मॅनेजर पूजा दादलानींची निळी मर्सिडीज इथे मुंबई पोलिसांना सीसीटीव्हीतून दिसली होती. त्या गाडीतील एका महिलेनं दुसऱ्या गाडीमधील व्यक्तींशी चर्चा केल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं होतं. याबाबत तपास मुंबई पोलिस करीत आहेत. त्याचबरोबर एनसीबी देखील याचा तपास करत आहे.
दरम्यान, एनसीबीचं हे पथक नंतर क्रूझ टर्मिनल वर जाऊन आणखी काही लोकांची चौकशी करणार असल्याची माहिती मिळत आहे. ड्रग्ज प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह ६ प्रकरणांची चौकशी एनसीबीचं एसआयटी पथक करणार आहे. रविवारी प्रकृती ठिक नसल्याचे कारण देत आर्यन खान एनसीबी चौकशीला उपस्थित नव्हता तर, आर्यनची प्रकृती ठिक असेल तर आज आर्यन खान चौकशीसाठी उपस्थित राहू शकतो.
एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी संजय कुमार सिंह यांच्या नेतृत्त्वात एसआयटीचं पथक शनिवारी मुंबईत दाखल झालं होतं. त्यानंतर एक दिवसांनी एसआयटीकडे मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणासह ६ प्रकरणांचा तपास सोपवण्यात आला आहे. दरम्यान, या ६ प्रकरणांचा तपास करण्यासाठी एसआयटीचं पथक दिल्लीहून मुंबईला दाखल झालं आहे. या पथकात १३ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दुसरीकडे एनसीबी अधिकाऱ्यांवर करण्यात येणाऱ्या आरोपांची चौकशी करण्यासाठीही एक पथक मुंबईत दाखल झालं आहे.






