एकतर्फी प्रेमातून विवाहित महिलेवर अ‍ॅसिड हल्ला

नवी दिल्ली (उपसंपादक जीवन षाकया) : येथे एकतर्फी प्रेमात माथेफीरू तरुणाने विवाहित महिलेवर अ‍ॅसिड हल्ला केल्याची घटना घडली आहे. या अ‍ॅसिड हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी तरुणाने पीडित महिलेला भेटण्याच्या बहाण्याने आपल्या घरी बोलावले. महिला घरी येताच तिला दोरीने बांधले आणि तिच्यावर अ‍ॅसिड फेकले. दरम्यान घटनेनंतर आरोपीला बिहारच्या बक्सर जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीमधील बवाना परिसरातील ही घटना आहे. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. मोंटू असं आरोपीचं नाव असून हल्ल्यानंतर तो बिहारमध्ये पळून गेला होता. त्याला आता बक्सर जिल्ह्यामधून अटक करण्यात आली आहे. दरम्यान पोलीस आल्याची माहिती मिळताच त्याने पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. गोळीबारामध्ये आरोपी मोंटू हा जखमी झाला आहे. त्याला दिल्लीमध्ये आणण्यात आले असून त्याच्यावर देखील उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पीडित महिला ही विवाहित असून ती दिल्लीमध्ये तिच्या पतीसोबत राहात होती. तिचा पती एका स्थानिक कारखान्यामध्ये कामाला होता. मोंटू हा देखील पीडितेच्याच गावचा रहिवासी आहे. आरोपी या महिलेवर एकतर्फी प्रेम करत होता. पतीला सोडून तू माझ्यासोबत राहायला ये अशी मागणी आरोपी वारंवार या महिलेकडे करत होता. मात्र तसे करण्यास महिलेने नकार दिल्याने तो संतापला आणि तिच्यावर अ‍ॅसिड हल्ला केला. या हल्ल्यात ही महिला गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here