नवी दिल्ली (उपसंपादक जीवन षाकया) : येथील द्वारका जिल्ह्याच्या दक्षिण परिसरात नोकरीच्या बहाण्याने आलेल्या तरुणीवर जबरदस्तीने दारू पाजून सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली असून, तिने विरोध केला असता तिचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न झाला. यानंतर आरोपीने तिच्या तोंडावर लोखंडी रॉडने वार केले. घटनेनंतर आरोपी मुलीला जखमी अवस्थेत हॉटेलमध्ये सोडून पळून गेला.
तरुणीने कशी तरी ही माहिती स्थानिक पोलिसांपर्यंत पोहोचवली. नंतर तिने लाईव्ह लोकेशन पोलिसांसोबत शेअर केले. यानंतर पोलीस जखमी मुलीपर्यंत पोहोचले. हॉटेलचा दरवाजा तोडून दुसऱ्या मजल्यावरून मुलीची सुटका करण्यात आली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. द्वारका दक्षिण पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापक संजय कुमार महतो याच्याविरुद्ध बलात्कार, सामूहिक बलात्कार, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, गुन्हेगारी कट रचणे आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करून अटक केलीय. पोलीस मुख्य आरोपी अंकित सेहरावतचा शोध घेत आहेत. हॉटेलमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरूनही पोलीस तपास करत आहेत.
द्वारका जिल्ह्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पिडीता (वय २५) ही द्वारका परिसरात कुटुंबासोबत राहते. ती सेल्स गर्ल म्हणून काम करते. ती चांगल्या नोकरीच्या शोधात होती. अलीकडेच अंकित सेहरावाल नावाच्या तरुणाशी तिची भेट झाली आणि सपनाला चांगली नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले. शनिवारी संध्याकाळी आरोपीने सपनाला फोन करून तिला भेटण्यास सांगितले. दोघांची भेट बिकानेर स्वीट्समध्ये झाली.
यानंतर रात्री ८ वाजण्याच्या सुमारास आरोपीने पीडितेला त्याच्या दुचाकीवर बसवून सेक्टर-९ जवळील सिल्व्हर पॅलेस हॉटेलमध्ये नेले. तेथे पीडितेने हॉटेलमध्ये जाण्यास नकार दिला. यानंतर आरोपीने सांगितले की, सर्वजण त्याला हॉटेलमध्ये ओळखतात, त्याची आई स्वत: पोलीस अधिकारी आहे. तो नुकताच हॉटेलमध्ये नोकरीबद्दल बोलण्यासाठी आला आहे. आरोपीने सपनाला दुसऱ्या मजल्यावर नेले. खोली क्रमांक-२०२ मध्ये पोहोचल्यावर आरोपीने पीडितेला जबरदस्तीने दारू पाजली. त्याला विरोध केला असता तिला बेदम मारहाण करण्यात आली. जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपीने तिच्यावर बलात्कार केला.
पीडितेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने इतर लोकांच्या मदतीने तिचा गळा दाबण्याचाही प्रयत्न केला. नंतर त्याने पीडित तरुणीवर वार करून रक्तबंबाळ केले. घटनेनंतर आरोपीने जीवे मारण्याची धमकी देऊन तेथून पळ काढला. पिडीतेची अवस्था पाहून हॉटेलचे बाकीचे कर्मचारीही तेथून पळून गेले. तेथून निघताना हॉटेलचा दरवाजा बंद करून आरोपी पळून गेले. पिडीतेने पोलिसांना फोन करुन, लोकेशन शेअर केले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना पिडीतेच्या किंकाळ्या ऐकू आल्या, मात्र हॉटेलचा दरवाजा बंद होता. दरवाजा तोडून पिडीतेला दुसऱ्या मजल्यावरून खाली आणण्यात आले. यानंतर तिला रुग्णालयात पाठवण्यात आले. तपासानंतर रविवारी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. या घटनेत हॉटेलच्या कर्मचाऱ्यांचाही हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. त्यामुळे त्यात सामूहिक बलात्काराची कलमे जोडण्यात आली आहेत.







