आदिवासी दिनानिमित्त ”रानभाज्या महोत्सव ” संपन्न

शहादा (विजय पाटील) – तालुक्यातील रामपूर येथे जागतिक आदिवासी दिवसाचे औचित्य साधून तालुकास्तरीय रानभाज्या महोत्सव साजरा करण्यात आला.पौष्टीक व सात्विक अशा रानभाज्या नामशेष होत चालल्या असून त्या भाज्यांचे महत्त्व भावी पिढीला कळावे आणि पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड मिळावी यासाठी कृषी विभाग शहादा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदिवासी दिवस साजरा करण्यात आला . या कार्यक्रमाचे अध्यक्षपद उपविभागीय कृषी अधिकारी व्हि.बी. जोशी यांनी भूषवले.रानभाज्या या विविध औषधी गुणांनी युक्त असून त्यातील पौष्टिक तत्व विविध रोगांवर उपयोगी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मानवी शरीरातील मानवी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील या भाज्या अतिशय महत्त्वाचे काम करतात.नामशेष होणाऱ्या या रानभाज्या टिकून ठेवा व त्यांची नवीन लागवड करून लोकांना सात्विक अन्न मिळेल या दृष्टीने सगळ्यांनीच प्रयत्न करावा. म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी शेती शाळा घेऊन त्यांना कमी उत्पादन खर्चात जास्त उत्पादन कसं मिळवता येईल. तसेच योग्य बियाणे ,खते ,फवारणी , पिकांवरील किड नियंत्रण विषयाचे मार्गदर्शन करण्यात आले. आजच्या आधुनिक युगातही पारंपरिक पद्धतीने शेती करण्याकडे त्यांचा अधिक कल दिसतो.रानभाज्या महोत्सव सारखे कार्यक्रम घेऊन त्या भाज्यांची माहिती लोकांना मिळावी व या शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ उपलब्ध व्हावी हीच अशा कार्यक्रमांची फलप्राप्ती असते.
रानभाज्या महोत्सवात प्रातिनिधिक स्वरुपात काही शेतकर्‍यांनी आपल्या शेतातील रानभाज्या त्या मोसमात आणल्या होत्या. त्यात प्रामुख्याने लाल अंबाडी ,माटला ,करड, डूमच्या, शेवगापान ,कटरला, चिरी , बांबू कंद ,फांग,शिरी,पोवड्या, बांजी,अडू ,मोखा इत्यादी रानभाज्या पाहायला मिळाल्या.या भाज्या उत्पादित करणारा हा मर्यादित घटक असून याचा विस्तार कसा करता येईल? या भाज्यांसाठी मार्केट कसे काबीज करता येईल? या विचाराने प्रेरित होऊन माननीय कृषी मंत्री दादा भुसे यांनी ही संकल्पना अस्तित्वात आणली आणि राज्यभर रानभाज्या महोत्सवाला सुरुवात झाली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहादा तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहाय्यक हरिभाऊ खोमणे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय कृषी अधिकारी व्ही. बी.जोशी तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.सुरेश नाईक ,नर्मदया पावरा रामपूर सरपंच व पंचायत समिती सदस्य देखील कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी मंडळ कृषी अधिकारी क्रांती जाधव यांनी आभार प्रदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here