इन्स्टाग्रामवरील मैत्री भोवली : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

rape-on-minor

सांगली (प्रतिनिधी दिनेश लोंढे) : इन्स्टाग्रामवरून मैत्री वाढवून लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका तरुणाला इस्लामपूर पोलिसांनी अटक केली. जयदीप जयपाल चौधरी (वय २३, रा. इस्लामपूर) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. न्यायालयासमोर उभे केले असता त्याला शनिवारपर्यंत (दि. १३ नोव्हेंबर) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित अल्पवयीन मुलीची जानेवारी २०२१ मध्ये इन्स्टाग्राम अ‍ॅपवर जयदीप चौधरी याच्याशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. दोघांमध्ये त्यातून चॅटिंग वाढत गेले. जयदीपने तिला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मार्च २०२१ मध्ये पीडित मुलगी इस्लामपूर येथे नातेवाईकांकडे आली होती. तेव्हा जयदीपने तिला इस्लामपूर एसटी स्टॅण्डवर भेटण्यासाठी बोलावले. जयदीप मुलीला घेऊन दुचाकीवरून बहे बेटावर गेला. पीडित मुलीला तिथे निर्जनस्थळी नेऊन जयदीपने शरीरसुखाची मागणी करत बळजबरी केली. मुलीने नकार देताच जयदीपने लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर १५ दिवसांनी पीडित मुलगी गावी निघाली असता पुन्हा त्याने तिला गाठले.

इस्लामपूर स्टॅण्डवरून तिला गावाला सोडण्याचा बहाणा करून वाठार येथील लॉजवर नेले व लग्नाचे आमिष दाखवून पुन्हा तिच्यावर त्याने बलात्कार केला. ७ नोव्हेंबर रोजी पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्याने मुलीच्या आईने तिला दवाखान्यात नेले. जयदीपने वारंवार बळजबरी केल्याने पीडित मुलगी ६ महिन्यांची गर्भवती असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. पीडित मुलीने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितल्यानंतर याबाबतची फिर्याद इस्लामपूर पोलीस ठाण्यात देण्यात आली. या फिर्यादीनुसार पोलिसांनी संशयीत जयदीप चौधरी याला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here