लग्नास नकार दिल्याने मुलीच्या आईला जातीवाचक शिवीगाळ

सातारा (प्रतिनिधी दिनेश लोंढे) : अल्पवयीन मुलीसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या तरुणाला मुलीच्या आईने नकार दिला. या कारणावरून संबंधित तरुणाने मुलीच्या आईसोबत गैरवर्तन केले. तसेच जातीवाचक शिवीगाळ केली.मुलीच्या वडिलांना फोन करून शिवीगाळ केली. तसेच मुलीच्या वडिलांना सोशल मीडियावर व्हिडिओ पाठवून त्रास दिला. याप्रकरणी विनयभंग,बाललैंगिक अत्याचार आणि अनुसूचित जाती जमाती अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार खेड तालुक्यातील भोसे येथे घडला. फिर्यादीवरून प्रदीप पांडुरंग हुंबे (रा. तरसवाडी, ता. खटाव, जि. सातारा) या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या १४ वर्षीय मुलीसोबत आरोपीला लग्न करायचे होते. मात्र या लग्नाला फिर्यादी यांनी नकार दिला. त्या कारणावरून आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्या मुलीसोबत गैरवर्तन करून मी तुझ्या मुलीला उचलून येणार आहे व तुला पण उचलून येणार आहे, असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ केली.

फिर्यादी यांच्या पतीला फोन करून आरोपीने शिवीगाळ व दमदाटी केली. आरोपीने काही व्हिडिओ बनवून फिर्यादी यांच्या पतीच्या मोबाईलवर पाठवून त्यांना त्रास दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here