मॅच हारलेल्या संघाकडून विजेत्या संघाच्या खेळाडूस मारहाण

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : क्रिकेट मॅच हारलेल्या संघाच्या दोघांनी मिळून विजेत्या संघाच्या एका खेळाडूला बॅटने बेदम मारहाण केली. ‘मी आताच जामिनावर सुटून आलो आहे. मला दुसरा पण खेळ खेळता येतो.तुला दुसरा खेळ दाखवू काय’, अशी धमकी देखील हरलेल्या संघाच्या खेळाडूने दिली. हा प्रकार मंगळवारी (दि. ९) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास टेल्को ग्राउंड शेजारी, पिंपरी येथे घडला.

याप्रकरणी सुमित सुधाकर शेट्टी (वय २१, रा. मोरवाडी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून सलमान शेख (वय 30, रा. विठ्ठलनगर, पिंपरी), समीर पठाण (वय 28) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांचा क्रिकेटचा सामना झाला. यामध्ये फिर्यादीची टीम विजयी झाली. त्यामुळे विजयी टीम जल्लोष करत असताना आरोपी सलमान शेख बॅट घेऊन धावत शिवीगाळ करत फिर्यादी यांच्याकडे आला. ‘तू व तुझ्या क्रिकेट टीमने विजय मिळवून खेळ दाखवला आहे. मी पण आताच जामिनावर सुटून आलो आहे. मला दुसरा पण खेळ खेळता येतो. तुला दुसरा खेळ दाखवू काय’, असे म्हणून सलमान शेख याने फिर्यादी यांच्या डोक्यात बॅटने मारले. आरोपी समीर पठाण यानेही फिर्यादी यांना दगडाने मारून जखमी केले. आरोपींच्या इतर साथीदारांनी फिर्यादी यांना हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here