दौसा (राजस्थान) : येथे गुरुग्रामहून मैत्रिणीकडे राहायला आलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. २३ वर्षीय तरुणी जयपूरच्या चुंगी परिसरात आपल्या मैत्रिणीकडे आली होती. दोन दिवसांपासून ती आपल्या मैत्रिणीकडे राहत होती.
मैत्रिणीचा बॉयफ्रेंड रविवारी तिथे आला. त्याने या तरुणीला आपल्यासोबत दौसा येथे नेले. त्याच्यासोबत अन्य दोन तरूणही होते. तिघे तरुणीला घेऊन दौसा येथे पोहोचले. तेथे तिला बीअर पाजली. त्यानंतर आरोपींचा आणखी एक मित्र तिथे आला. चौघांनी तरुणीला बीअर पाजल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला.
या घटनेनंतर चौघेही पीडित तरुणीला तिथेच सोडून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पीडितेला दौसा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. आरोपींनी मारहाण केल्याचेही पीडितेने सांगितले. पीडितेच्या जबाबानुसार, पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पीडितेची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली. दुसरीकडे आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी विविध पथके स्थापन केली आहेत. सर्व पथके वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत आहेत. पोलिसांचे एक पथक तातडीने जयपूरच्या चुंगी परिसरात पोहोचले. तिथे पीडित तरुणीच्या मैत्रिणीची चौकशी करण्यात येणार आहे.







