कोरेगावात जिलेटिनचा बेकायदा साठा जप्त; चौघा जणांवर गुन्हा दाखल

सातारा (प्रतिनिधी दिनेश लोंढे) : जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात शेंदुरजणे आणि भाटमवाडी येथे मंगळवारी दुपारी आणि रात्री दहशतवादविरोधी कक्ष आणि कोरेगाव पोलिसांनी वेगवेगळी कारवाई करीत सुमारे २५० किलो जिलेटिनच्या कांड्यांचा साठा जप्त केला. या कारवाईत एक टाटा सुमो जीप, एक दुचाकी आणि मोबाईल जप्त करण्यात आला असून, एकूण मुद्देमालाची किंमत तीन लाख रुपये आहे. याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.

कोरेगाव-भाडळे रस्त्यावर शेंदुरजणे गावच्या हद्दीत शेरखान अल्लाबेली मन्सुरी व त्याचा वाहनचालक संतोष हिंदूराव पवार (रा. धावडशी, ता. सातारा) यांच्याकडे २०० किलो वजनाच्या १६०० जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्या. जिलेटिन कांड्यांच्या बॉक्सवरील माहिती जाणूनबुजून खोडून टाकण्यात आली असल्याचे निदर्शनास आले. या कारवाईत टाटा सुमो जीप जप्त करण्यात आली. याप्रकरणी हवालदार हणमंत भोसले यांच्या फिर्यादीवरून कोरेगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

कोरेगाव-पुसेगाव रस्त्यावर भाटमवाडी गावच्या हद्दीत कोरेगाव पोलिसांच्या पथकाने कारवाई करीत ५० किलो वजनाच्या जिलेटिनच्या ४०० कांड्या जप्त केल्या. या कारवाईत एक दुचाकी व एक मोबाईल जप्त करण्यात आला. याप्रकरणी देवा बेरवा व राजू बालोजी डोली (दोघे रा. भिलवाडा, राजस्थान) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी साहिल झारी यांनी फिर्याद दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here