हडपसरमध्ये महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग करणारा आरोपी अटकेत

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : येथील हडपसर परिसरात एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इतक्यावर न थांबता आरोपीने पोलिसात तक्रार केल्यास ठार मारण्याची धमकी सु्द्धा पीडितेला दिली होती. हडपसर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

सागर अशोक जावळे (रा. मांजरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान, मुलीला धमकावणारा त्याचा मित्र सुरज बरूडे हा पसार असून,त्याचा शोध घेण्यात येत आहे. याबाबत पिडीत मुलीच्या ४० वर्षीय आईने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी १७ वर्षे वयाची असून ती हडपसर परिसरातील नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेते. आरोपी सागर हा या मुलीवर एकतर्फी प्रेम होते. गुरुवारी ही मुलगी महाविद्यालयात गेली असता सागरने तिचा पाठलाग केला आणि तिला कट मारून पुढे गेला. तरीही या मुलीने दुर्लक्ष केले मात्र ही मुलगी महाविद्यालयाच्या आवारात उभी असताना आरोपी त्या ठिकाणी गेला आणि त्याने तिला प्रेमाची गळ घातली. त्यानंतरही पीडित मुलीने त्याला नकार दिला.

दरम्यान या सर्व प्रकारानंतर आरोपी सागरचा मित्र सुरज या ठिकाणी आला आणि त्याने पीडित मुलीला आणि तिच्या मैत्रिणीला धमकावले. नजर खाली ठेवून बोलायचे आणि पोलिसात तक्रार दिली तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here