साखरपुड्यासाठी हॉल बुक करण्यास जाणाऱ्या नवरदेवाचे पाच लाख रुपये चोरट्यांनी लांबवले

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जबरी चोरीचा एक प्रकार उघडकीस आला आहे. साखरपुड्यासाठी हॉल बुक करण्यासाठी निघालेल्या नवरदेवाचे पाच लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.

कदमवाक वस्ती परिसरात हा प्रकार घडला असून भर दुपारी घडलेल्या या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सागर तुपे (वय 26, रा. हडपसर) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांनी फिर्यादीचा साखरपुडा होणार आहे. त्यासाठी त्यांना एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बुकिंग करायचे होते. जवळ पाच लाख रुपयांची रोकड घेऊन ते कदमवाक वस्ती परिसरात मित्राची वाट पाहत थांबले होते. यादरम्यान त्यांनी रोख रक्कम असलेली पिशवी आपल्या चार चाकी गाडीत ठेवली होती.

कदमवाक वस्ती येथील शिवतारा हॉस्पिटल समोर त्यांची चार चाकी गाडी उभी होती. अज्ञात चोरट्याने हीच संधी साधून गाडीची काच फोडून रोख रक्कम असलेली पिशवी चोरून नेली. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पोलीसांकडे धाव घेतली. दरम्यान, पोलीसांनी सीसीटीव्हीची पडताळणी केली असून, त्यात चोरटे दुचाकीवर आलेल्याचे दिसत आहे. त्यानुसार त्यांचा शोध सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here