पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : येथील कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बोपदेव घाटात चार अल्पवयीन चोरट्यांनी शस्त्रांचा धाक दाखवून दुचाकीने जाणाऱ्या दोघांना लुबाडल्याचा प्रकार गुरुवारी सायंकाळी घडला. या घटनेमुळे रात्रीच्या वेळी या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. याप्रकरणी विक्रांत गारगोटे (वय २७, रा. राजगुरूनगर) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, १७ वर्षे ६ महिन्यांच्या चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे राजगुरूनगर येथील रहिवासी आहेत. गुरुवारी सायंकाळी ते आपल्या एका मित्रासोबत सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पुण्याकडे येत होते. बोपदेव घाटेत आल्यानंतर नेमका अंधार पडला. त्याचवेळी दोन दुचाकीवर पाठीमागून चौघेजण आले, त्यांनी तक्रारदारांची दुचाकी अडवून त्यांना शस्त्राच्या धाकाने धमकावले. त्यांना मारहाण केली व त्यांच्याजवळील पाकिट व त्यातील रोकड चोरून नेली.
तक्रारदार यांनी पोलीसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलीसांनी काही वेळातच त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.







