पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : येथील फरासखाना पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका सराफा व्यावसायिकाची तब्बल दीड कोटी रुपयांनी फसवणूक करण्यात आली. सोन्याचे दागिने बनवण्यासाठी दिल्यानंतर ते परत न करता फसवणूक केली आहे. याप्रकरणी जमार इब्राहीम शेख (वय ४१, रा. कसबा पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यानुसार, मेहबुब शेख (रा. रविवार पेठ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २०१८ ते २०२१ या कालावधीत घडला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि आरोपी एकमेकांना चांगल्याप्रकारे ओळखतात. यातील जमार हे सोन्याचे दागिने बनविणारे व्यापारी आहेत. तर, आरोपी देखील सोन्याचे दागिने बनवित असत. त्यांची काही वर्षांपुर्वी ओळख झाली होती. ओळखीतून त्याने तक्रारदार यांचा विश्वास संपादन केला. तक्रारदार यांच्याकडून चोख सोने दागिने बनविण्यासाठी घेतले. त्याने फिर्यादी कडून वेळोवेळी एक कोटी ४३ लाख रुपयांचे सोने घेतले होते.
दरम्यान या कालावधीत आरोपीने फिर्यादीला बनावट सोने दाखवून ते खरे असल्याचे भासविले. त्यानंतर खरे सोने दुसऱ्या व्यक्तीला विकून फिर्यादीची फसवणूक केली. फरासखाना पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक अमित शेटे हे करत आहेत.






