धुळे (प्रतिनिधी) : पोलिसांत तक्रार दिल्याचा राग आल्याने दोंघांनी एका महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केला. इतकंच नाही तर या आरोपींनी स्वयंपाकघरातील गॅसवर उलथणी गरम करुन पीडित महिलेच्या हाताला चटके दिलेत. पतीसह मुलांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली. ही घटना शहरातील नचबारी परिसरात घडली आहे. या प्रकरणावरुन चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, काही दिवसांआधी पीडित महिलेने संबंधित आरोपींविरोधात धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पीडित महिलेने तिच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची तक्रार दिली होती. याच रागातून बदला घेण्यासाठी आरोपींनी विचित्र कृत्य केलं. योगेश रामदास पिंजन आणि जयदीप सखाराम पिंजन (दोघे रा. सोनेवाडी) यांनी पीडितेच्या घरात बळजबरीने शिरुन त्या महिलेबरोबर लज्जास्पद कृत्य केलं आहे. एका आरोपीनं पीडित महिलेचे दोन्ही हात घट्ट पकडले, तर अन्य एका आरोपीनं स्वयंपाक घरात सुरू असलेल्या गॅसजवळ पडलेली उलथणी गरम करून पीडितेला गरम चटके दिले.
दरम्यान, या घटनेनंतर पीडित महिलेनं चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात २ संशयित आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी मारहाणीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस तपास करत आहेत.







