पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : शेअर मार्केटचे तज्ञ असल्याचे भासवत येथील एका ३७ वर्षीय महिलेला तब्बल दहा लाख रुपयांना गंडा घालण्याचा प्रकार समोर आला आहे. या महिलेने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात मोबाईल धारकावर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेअर मार्केटचे खाते हँडेल करण्यासाठी घेऊन ही फसवणूक करण्यात आली.
याप्रकरणी समजलेली माहिती अशी की, फिर्यादी या पुण्यातीलच एका खाजगी कंपनीत काम करतात. लोहगाव परिसरात या वास्तव्याला आहेत. शेअर मार्केट मध्ये त्यांचे अकाउंट असून ते त्या स्वतः भांडण करत होत्या. दरम्यान मागील काही दिवसांपासून त्यांना पनाश अँड सन्स प्रा. लि. या कंपनीच्या मोबाईल नंबरवरून फोन करण्यात येत होता. तुमचे शेअर मार्केट आम्ही हँडल करू आणि त्यातून तुम्हाला चांगला परतावा मिळवून देऊ असे आश्वासन ते सतत दाखवत होते.
दरम्यान वारंवार फोन येत असल्यामुळे फिर्यादी महिलेने त्यांच्यावर विश्वास ठेऊन आपले शेअर मार्केटचे खाते त्यांना हँडल करण्यासाठी दिले. त्यानंतर आरोपीने त्यांना एकूण १० लाख ३१ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. त्यावेळी आरोपींनी त्यांना तीन ते चार महिने परतावा देखील दिला. मात्र, त्यानंतर परतावा दिला नाही व त्यांना पैसेही न देता त्यांची फसवणूक केली आहे.






