कोणार्क एक्सप्रेसमधून ८ किलो गांजा जप्त

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : जिल्ह्यातील दौंड येथे लोहमार्ग पोलिसांनी केलेल्या कारवाईत 8 किलो गांजा जप्त करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई दौंड लोहमार्ग पोलिसांनी भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्सप्रेसमध्ये शुक्रवारी (दि. १२) केली, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक युवराज कलकुटगे यांनी दिली.

पोलिसांनी या प्रकरणी चित्तरंजन मांझी व पपुन रामचंद्र प्रधान (दोघे रा. धनंजयापुर, गंजाम, ओडिशा) या दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून चार पाकिटातील एकूण ८ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी ही कारवाई कुर्डुवाडी ते दौंड रेल्वे स्थानक दरम्यान धावत्या गाडीत केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुर्डूवाडी रेल्वे स्थानकावरुन शुक्रवारी रात्री कोणार्क एक्सप्रेस दौंडच्या दिशेने रवाना झाल्यावर बी-६ डब्यातील दोन प्रवाशांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. गस्तीवरील रेल्वे सुरक्षा दलाचे हवालदार जवळकोटे यांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून याची माहिती दिली. त्यानंतर कोणार्क एक्सप्रेस दौंड रेल्वे स्थानकावर आल्यानंतर बी-६ डब्यातील प्रवाशांची लोहमार्ग पोलीस आणि दौंड रेल्वे सुरक्षा दल पोलिसांकडून संयुक्तपणे झडती घेण्यात आली.

या झडतीत दोघांकडे ८ किलो गांजा आढळून आला. रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक तेजप्रकाश पाल लोहमार्ग पोलीस दलाचे फौजदार ताराचंद सुडगे, रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक फौजदार गुजर व मीना यांनी दोघांना ताब्यात घेतले. हा गुन्हा कुर्डुवाडी हद्दीत घडला असल्याने दौंड लोहमार्ग पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करुन पुढील तपासाकरीता कुर्डूवाडी लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here