कुख्यात आंतरजिल्हा मंगळसूत्र चोर जेरबंद

जालना (प्रतिनिधी) : येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कुख्यात आंतरजिल्हा मंगळसूत्र चोराला जेरबंद केले असून त्याच्या ताब्यातून ८ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपीने जालना जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील मंगळसूत्र चोरीचे गुन्हे केलेले आहेत.

जालना शहरामध्ये काही दिवसांपासून महिलांना एकटे गाठून गळ्यातील मंगळसूत्र चोरुन नेण्याच्या घटना घडत होत्या. सदर घटनांचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधिक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला सुचना दिल्या होत्या. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांनी स्थानिक गुन्हे जालना येथील अधिकारी व कर्मचारी यांची दोन पथके तयार करुन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सुचना व मार्गदर्शन केले.

९ नोव्हेंबर रोजी पोलीस नाईक कृष्णा तंगे व पोलीस नाईक सचिन चौधरी पेट्रोलिंग करीत असतांना मोटार सायकलवर एक इसम संशयीतरित्या वावरतांना दिसला. पोलिसांनी हा इसम मंगळसूत्र चोर असल्याचे खात्री झाल्याने पाठलाग करून त्याला पकडले. सुरुवातीला चौकशीदरम्यान सदर आरोपी उडवा उडवीचे उत्तरे देवू लागला. परंतु पोलीसी खाक्या दाखवताच आरोपीने चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली.

सदर आरोपीने जालना शहरातील एकूण १० मंगळसूत्र जबरीने चोरी केल्याची कबुली दिली असून आरोपीकडून एकूण १५९ ग्रॅम वजनाचे ७ लाख ९५ हजार रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहे. तसेच गुन्हा करतांना वापरलेली काळ्या रंगाची पल्सर मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने त्याच्याकडून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here