आगपेटीत कमी काड्या दिल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने एकास मारहाण

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : आगपेटीमध्ये कमी काड्या दिल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने, सहा जणांनी मिळून शिवीगाळ करत एकास मारहाण केली. या प्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि.१६) सायंकाळी पाचच्या सुमारास खेड तालुक्यातील सेलू आसखेड येथे घडली.

या प्रकरणी ३० वर्षीय महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दत्ता गाडे, तन्मय दत्ता गाडे, नारायण गाडे, सुखदेव गाडे आणि दोन महिला (सर्व रा. सेलू आसखेड, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दत्ता गाडे याची सेलू आसखेड येथे टपरी आहे. फिर्यादी यांच्या पतीने आरोपी दत्ता गाडे यांच्या टपरी मधून आगपेटी आणली. त्यामध्ये कमी काड्या होत्या. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी आणि त्यांचे कुटुंबीय गेले. त्यावेळी सर्व आरोपींनी मिळून फिर्यादी यांना शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here