पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : पोटच्या तीन वर्षांच्या मुलालाच विषारी औषध पाजून खून करणाऱ्या आईला न्यायालयाने जन्मठेप आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. आगरवाल यांनी हा आदेश दिला.
कौटुंबिक वादाच्या कारणातून त्या महिलेने मुलाला विषारी औषध पाजले होते. त्यानंतर आईनेदेखील औषध घेतले आणि गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला होता. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. त्यामुळे त्या महिलेला अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील ॲड. लीना पाठक यांनी केली. ही मागणी ग्राह्य धरत न्यायालयाने हा निकाल दिला.
स्वाती विक्रम माळवदकर (वय २५, रा. तळवडे) असे शिक्षा सुनावलेल्या महिलेचे नाव असून, तळवडे येथे २ ऑगस्ट २०१६ रोजी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली होती. याबाबत स्वातीचे दीर श्रीकांत माळवदकर (वय ३०) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार स्वाती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.






